७ फेब्रुवारी-कोरोनामुळे गुलाब उत्पादक शेतकरी मालामाल
NEWS24सह्याद्रि
कोरोनाने सलग दोन वर्षे भल्याभल्यांचं कंबरडं मोडलं. प्रेमाचा प्रतीक असणारा गुलाब फुलविणारा शेतकरी तर अक्षरशः मेटाकुटीला आला. पण याच कोरोनाने आता या गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आणलेत. निर्यातीला पसंती देणाऱ्या या शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पुण्याच्या मावळमधील पंडित शिकारे हे त्यांनी फुलविलेला गुलाब सलग पंचवीस वर्षे निर्यात करतात. एक एकर पासून त्यांनी सुरू केलेली ही शेती आज दहा एकरात विस्तारलेली आहे. याच क्षेत्रात बहरलेला गुलाब ते भारतासह परदेशी बाजारात खास व्हॅलेंटाईन डे साठी पाठवितात. आत्तापर्यंत ते सत्तर टक्के परदेशात अन तीस टक्के भारतात विक्री करायचे. पण कोरोनामुळं निर्यातीवर निर्बंध आले, अन सलग दोन वर्षे त्यांना मोठा फटका बसला. पण यंदा याच कोरोनाने शिकारेंना भारतीय बाजारपेठेत मालामाल केलंय. आज त्यांच्या प्रति गुलाबाला 18 ते 21 रुपये असा आजवरचा सर्वात उच्चांकी बाजारभाव मिळालाय. म्हणूनच यंदा ते तब्बल सत्तर टक्के गुलाब भारतातच विक्री करतायेत.