बीडमधील केज जवळ जळालेल्या कारचा थरार
NEWS24सह्याद्रि
लातूरहून केजकडे निघालेल्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारच्या एसीमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच गणेश महापूरकर यांनी गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. लातूर-बीड रस्त्यावर कुंबेफळ जवळ या कारने पेट घेतला. पेट घेतल्यानतंर काही वेळातच परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. पेट घेतलेल्या कारमध्ये डिझेल असल्यामुळे या कारच्या जवळ जाण्याचे कोणीही धाडस करत नव्हते.
लातूर येथे चार्टर्ड अकाउंटंट असलेले गणेश महापूरकर हे आपल्या कुटुंबासोबत सकाळीच लातूरहून निघाले होते. साधारण शंभर किलोमीटर आल्यानंतर अचानक कुंबेफळ गावाच्या नजीक कारच्या एसीतून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे महापूरकर यांनी तत्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली आणि कारमधील सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. गणेश महापूरकर यांच्यासोबत इतर चार जण कारमधून खाली उतरले आणि अवघ्या काही सेकंदामध्ये कारने पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणूनच यावेळी कार लॉक झालेली नव्हती.
पेट घेतल्यानंतर महापूरकर यांनी कारचे बोनट उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते लॉक झाले होते, त्यामुळे आगीचा अंदाज येत नव्हता. अर्धा ते पाऊन तास ही आग अशीच धुमसत होती. पाऊन तासानंतर संपूर्ण कार जळून खाक झाली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वेळीच प्रसंगावधान साधल्याने गणेश महापूरकर यांच्यासोबतच इतर चार जणांचे प्राण वाचले. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची अद्याप माहिती मिळाली नाही.
No comments
Post a Comment