५ फेब्रुवारी-राकेश परब यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी...
NEWS24सह्याद्रि
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणी आजच जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांचे वकील सतीश माने शिंदे व संग्राम देसाई यांच्याकडून प्राप्त झाली आहे,
कणकवली करंजे येथील शिवसैनिक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे बँक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडे आमदार नितेश राणे व पीए राकेश परब आदींची नावे समोर आली होती त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती. या दरम्यान आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. तोही न्यायालयाने फेटाळला होता. कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोन दिवसांपूर्वी शरण आले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती. आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी सरकारी पक्षाचे वकील प्रदीप घरत यांनी आमदार राणे यांना पोलिस कोठडी मिळावी म्हणून युक्तिवाद केला त्यांना तपासासाठी पुणे येथे न्यावयाचे आहे. तसेच काही आर्थिक व्यवहार केले आहेत किंवा कसे ते तपासायचे आहे तसेच फिर्यादीचा फोटो मुख्य संशयिताला त्यांनी मोबाईल द्वारे पाठवला होता त्याबाबत तपास करण्यासाठी आठ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.
भाजपचे आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणे यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता तब्येत बरी नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत ऐवजी आमदार राणे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत.
No comments
Post a Comment