११ फेब्रुवारी-शांतता राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन
NEWS24सह्याद्रि
हिजाबच्या मुद्यावरुन विनाकारण महाराष्ट्रामध्ये वादंग निर्माण करु नये. दुसऱ्या राज्यामध्ये हिजाबचा विषय झाला आहे असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.हिजाबच्या मुद्यावरून कर्नाटक राज्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. देशभरामध्ये याचे पडसाद उमटाताना दिसत असतानाच, महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटत आहेत. हिजाबच्या मुद्यावरुन आज मालेगावमध्ये हिजाब दिन पाळण्यात येत आहे. या सर्व प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही बाजूंनी हा विषय समजून घेतला पाहिजे. विनाकारण या विषयावरुन महाराष्ट्रामध्ये वादंग निर्माण करु नये. दुसऱ्या राज्यामध्ये हिजाबचा विषय झाला आहे, त्यावरुन आपल्या राज्यामध्ये अशांतता नको असे वळसे पाटील यावेळी म्हणाले. सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा राज्यामध्ये अस्वस्थता पसरेल, अशांतता निर्माण होईल असी भूमिका घेऊ नये असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.
सर्न नागरिकांसह राजकीय पक्षांना शांतता राखण्याचे मी आवाहन करत असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले. परराज्यातील मुद्यावर अनावश्यक संघर्ष झाल्यास समाजात दुही तयार होईल असे यावेळी पाटील म्हणाले. माझे सर्व धर्मगुरुंना आवाहन आहे की, त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करु नये. तुमचे सर्वांचे हक्क आहेतच. या गोष्टीचे भांडवल करु नये, असे वळसे पाटील यावेळी म्हणाले. सर्वांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे असे ते म्हणाले. मालेगावमध्ये आंदोलन होऊ नये, जरी झाले तरी ते शांततेत व्हावे असे ते म्हणाले. दरम्यान, राज्यातील पोलिसांना मी सुचना दिल्या आहेत, सर्व परिस्थितीवर ते नियंत्रण ठेवतील.
मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. त्याआधी गुरुवारी मालेगावातल्या मैदानात हजारो महिलांनी एकत्र येऊन हिजाबचं समर्थन केलं. या मेळाव्यात मौलानांनी महिलांना मार्गदर्शन केलं. आज हिजाब दिनानिमित्त हिजाब परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय या महिलांनी जाहीर केलाय. दुसरीकडे जालन्यातही काल मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. या मोर्चात शेकडो मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. बुलडाणा शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. कर्नाटकात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लीम मुलींच्या हिजाबवर बंदी घालण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात आज मोर्चा, निदर्शने आणि आंदोलनाची शक्यता आहे.
No comments
Post a Comment