७ फेब्रुवारी-बदलत्या हवामानामुळे आवक घटल्याने भाज्यांच्या दरांमध्ये वाढ
NEWS24सह्याद्री
राज्यात मागील काही दिवस अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यात देखील आहे. बदलत्या हवामानामुळे फळभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर झाला आहे. मंडईत भाजीपाल्यांचे भाव चांगलेच कडाडलेत. अहमदनगरमध्ये गवारीने 150 रुपये प्रति किलोचा भाव घेतला आहे. तर इतर भाज्यांचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. जिल्ह्यात कमी अधिक फरकाने सर्वत्र भाजीपाल्यांचे भाव वाढल्याचे चित्र आहे. भाजीपाल्यांचे दर सरासरी 30 ते 50 रुपये किलो असतात. हवामानातील बदलामुळे सर्व पिकांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. मात्र, तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकं वाढवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात या भाव वाढीमुळे काहीही पडत नसून व्यापारी एका दिवसात 20 ते 40 टक्के नफा कमवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत, मागील काही दिवसांपासून गवार, शेवगा यांची आवक फारच कमी होत आहे. त्यामुळे ठोक बाजारात गवारीला 110 ते 120 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे तर शेवग्याला 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहेत असं व्यापारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. आवक आणि मागणीचा समतोल राखण काहीसं कठीण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
बाजारात भाज्यांचे भाव जरी वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे शेतकरी वर्गातुन प्रतिक्रिया येत आहेत ,मजुरी यांचा खर्च वजा केला असता शेतकऱ्यांना केवळ 4 ते 5 रुपये मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
No comments
Post a Comment