११फेब्रुवारी-कळसूबाई शिखरावर रोप-वे
NEWS24सह्याद्रि
नगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे सह्याद्री पर्वत रांगेतील १ हजार ६४६ मिटर उंचीचे कळसूबाई शिखर हे राज्यातील सर्वोच्च शिखर होय. अकोले व इगतपुरी तालुक्यातून शिखरावर जाण्यासाठी मार्ग आहेत. मात्र अकोले तालुक्यातील बारी गावातून शिखरावर जाण्यासाठी असणारा रस्ता हा प्रमुख मार्ग आहे. गड किल्ल्यावर भटकंती करणारांचे हे शिखर आवडते असून दरवर्षी मोठया संख्येने ट्रेकर्स येथे येत असतात,शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर असून अनेक भाविकांची ही देवी कुलदैवत आहे. नवरात्रात नऊ दिवस मोठय़ा संख्येने भाविक शिखराला भेट देतात.कळसूबाई नजीकच भंडारदरा धरण असून हजारो पर्यटक तेथे येतात. पर्यटकांचे आकर्षण असणारी साम्रद येथील सांदण दरी, घाटघर, रतनगडसारखी पर्यटन ठिकाणे याच परिसरात आहेत.
पर्यटकांच्या सोयीसाठी कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे व्हावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. काल, मंगळवारी मुंबई येथे या संदर्भात राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवसथापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी या बैठकीला उपस्थित होते.
कळसूबाई शिखरावर सर्वसामान्य पर्यटकाला जाता यावे यासाठी रोपवेची सुविधा करण्याबाबत सविस्तर माहिती व त्याची आवश्यकता डॉ. लहामटे यांनी विशद केली. भंडारदरा येथे येणाऱ्या पर्यटकांना कळसूबाई शिखर गाठता यावे यासाठी रोपवे बनविण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण अहवाल करण्याबाबतच्या सूचना मंत्री तटकरे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या व रोपवेमुळे भविष्यात वाढणाऱ्या संभाव्य पर्यटक संख्येबाबत सविस्तर माहितीसह अहवाल सादर करण्याबत निर्देश यावेळी देण्यात आले.
No comments
Post a Comment