११ फेब्रुवारी-चंद्रभागेतील दूषित पाण्यापासून वारकऱ्यांची अखेर सुटका
चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था करण्यात आली आहे.आज माघ दशमी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या दूषित पाण्यामुळे भाविकांना त्वचा रोग होऊ लागल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने आदेश देत चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था केली आहे. आज माघ दशमी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
विठ्ठल दर्शनापूर्वी पवित्र चंद्रभागा स्नानाची परंपरा वारकरी संप्रदायात असल्याने हजारो भाविकांनी आज या शुद्ध पाण्यात स्नानाचा आनंद घेतला. चंद्रभागेवरील गुरसाळे बंधाऱ्यातून काल सायंकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पूर्वीचे प्रदूषित झालेले अळ्यायुक्त पाणी आता वाहून गेले असून त्याठिकाणी हे नवीन पाणी पोचल्याने भाविकांना चांगल्या पाण्यात स्नान करता येत आहे.
सध्या एसटीचा संप अजूनही संपला नसल्याने यंदा कार्तिकी वारी प्रमाणे माघी यात्रेवरही परिणाम होईल असे वाटत असताना आज हजारोंच्या संख्येने भाविक मिळेल त्या वाहनाने पंढरपूरमध्ये पोहोचले आहे.
No comments
Post a Comment