११ फेब्रुवारी-किरीट सोमय्या संतापले
NEWS24सह्याद्रि
पुणे महापालिकेत धक्काबुक्की झाल्यानंतर भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा पुण्यात दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळ्याप्रकरणी निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार होते. पण यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याने किरीट सोमय्या पायरीवर पडून जखमी झाले होते. दरम्यान भाजपा आता त्याच पायरीवर किरीट सोमय्या यांचा सत्कार करत शिवसेनेला उत्तर देणार आहे. मात्र त्याआधी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेवर गंभीर आरोप केले.
पुणे विमानतळावर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका उद्धव ठाकरेंना दिला आहे का? उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं असून कारवाई झाली पाहिजे. मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन यांच्यावर कारवाई करा”.
“गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच,’” असा इशारा यावेळी त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, “सत्काराला महत्व नाही. त्या कंपनीवर कारवाई करावी लागणारच आहे. संजय राऊतांना जाब द्यावा लागणार. संजय राऊत धमकी कोणाला देतात?”.
“संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच,” असा विश्वास किरीट सोमय्यांनी व्यक्त केला आहे.
किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह १० जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना जामीनदेखील मंजूर झाला. दरम्यान दुपारी ४ वाजता किरीट सोमय्या महापालिकेत येऊन आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या पायरीवर सोमय्या यांना धक्काबुक्की झाली तिथे भाजपाकडून जंगी स्वागत आणि पुष्पहार घालण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून महापालिकेला छावणीचे स्वरुप आले आहे.
No comments
Post a Comment