१२ फेब्रुवारी-आढळरावांचं अमोल कोल्हेंना आव्हान
पुण्याच्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात येऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला तो शब्द सत्यात उतरवावा, असं खुलं आव्हान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलंय. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळरावांनी कोल्हेना निमंत्रण धाडलं आहे.
'सर्वोच्च न्यायालयाचा लढा जिंकून देईन अन् शर्यतीच्या पहिल्याच बारीत मी स्वतः घोडीवर बसेन', असं आश्वासन खासदार कोल्हे यांनी 2019च्या लोकसभा प्रचारात दिलं होतं. पण आता शर्यतींना परवानगी मिळाली तरी कोल्हे अद्याप कोणत्याच शर्यतीच्या घाटावर आढळलेले नाहीत. त्यातच मावळ तालुक्यासह आढळराव यांच्या गावात शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील पहिली शर्यत भरली.
तेव्हा विद्यमान खासदार कोल्हे यांचा फोटो आपण फ्लेक्सवर छापला नाही, महाविकासआघाडीचा धर्म का पाळला नाही, असा प्रश्न पत्रकारांनी आढळराव यांना विचारला. तेव्हा आढळरावांनी फारसं बोलणं टाळलं पण दोन दिवसीय शर्यतीच्या पहिल्या दिवसाची सांगता होताना, ते शर्यतीत सहभागी झालेल्यांचे आभार मानत होते.
त्यावेळी याच शर्यतीवरून राजकारण झालं, सशर्त परवानगी मिळाल्यावर 1 जानेवारीला राज्यात पहिली बारी आपली होणार होती. पण ऐनवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली. त्यावरून काय-काय राजकारण झालं हे सर्वांनाच माहिती आहे. हाच धागा धरत आढळरावांनी लोकसभेच्या प्रचाराची आठवण करून दिली. मी कोल्हे यांना निमंत्रण आधी ही दिलंय, आत्ताही देतोय. त्यांनी पहिल्या बारीला घोडीवर बसण्याचं आश्वासन पूर्ण करावं. यासाठी का होईना त्यांनी माझ्या गावात यावं आणि बैलगाडा शौकिनांना दिलेला शब्द पूर्ण करावं, असं खुलं आव्हान आढळरावांनी कोल्हे यांना दिलं आहे.
No comments
Post a Comment