११ फेब्रुवारी- मोहीत कंबोज यांचं खुलं आव्हान
NEWS24सह्याद्रि
सध्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचा हंगाम सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशभरात भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबतच प्रादेशिक पक्षांनीही आपापली ताकद पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं देखील गोवा, उत्तर प्रदेश या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये दौरा करत असून त्यांना भाजपाकडून आव्हान देण्यात आलं आहे.भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर ‘महाराष्ट्रातील सलीम-जावेद जोडीतील जावेद’ असं म्हणत खोचक निशाणा देखील साधला आहे.
संजय राऊतांच्या निवडणूक दौऱ्यांना लक्ष्य करत मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे. “माझा तुम्हाला प्रश्न आहे. ४० वर्षांपासून तुम्ही शिवसेनेत आहात. पूर्ण देशभरात फिरून तुम्ही निवडणुकीचं काम करत आहात. मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही कोणती निवडणूक लढवली? कोणत्या ठिकाणी असं झालं की तुम्ही जाऊन प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून आला. तुम्ही जिथे जिथे गेलात, तिथे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं”, असं मोहित कंबोज म्हणाले.
यावेळी मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना मुंबई पालिकेची निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. “मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब. २०२२च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या. मुंबईतला तुम्हाला वाटेल तो सर्वात सुरक्षित वॉर्ड घ्या आणि तिथून निवडणूक जिंकून दाखवा. तेव्हा आम्ही मानू की तुम्ही किती मोठे चाणक्य आहात. २०२२ आणि २०२४-२९ च्या गोष्टी तुम्ही करता. उत्तर प्रदेशपासून गोवा आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या गप्पा तुम्ही करता. पण त्याआधी २०२२मध्ये संजय राऊत निवडणूक जिंकू शकतात का, हे लोकांना सिद्ध करून दाखवा”, अशा शब्दांत मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे.
No comments
Post a Comment