Breaking News

1/breakingnews/recent

जय भीम - चित्रपट नव्हे; एक प्रबोधन, एक प्रेरणा ,एक चळवळ !

No comments


'सूर्यवंशी' 05 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. . 'सिंघम' आणि 'सिम्बा' नंतर रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्समधला पुढचा चित्रपट. पूर्वीच्या पोलिसांप्रमाणेच सूर्यवंशीही कायदा हातात घेणारा आहे. कायदा मोडीत काढणारा आहे . अशा  चित्रपटांना समाजाच्या चांगुलपणाचा आकार दिला जातो . तुमच्यापैकी अनेकजण चित्रपट बघायलाही गेले असतील. त्यातील नायकाने  कायदा हातात घेतल्याच्या सीनवर टाळ्या वाजवल्या असतील. प्रसंगी शिट्टीही वाजवली असेल. पण हे करण्यापूर्वी एकदा तमिळ चित्रपटाचा विचार करा. कारण आम्ही नुकत्याच रिलीज झालेल्या 'जय भीम' चित्रपटाबद्दल बोलतोय. 


या चित्रपटात पोलीस काही आदिवासी समाजातील पुरुषांना जबरदस्तीने घेऊन जातात आणि तिथे त्यांचा छळ केला जातो. तो देखील अशा पद्धतीने की  हे दृश्य बघून तुम्ही रागाने दात खाल. पोलीस त्यांना एका अशा गुन्ह्याची कबुली देण्यास सांगतात जो त्यांनी केलेलाच नसतो. त्या आदिवासींपैकी एक म्हणजे राजकानू.

ज्याची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी चंद्रू नावाच्या वकिलाची मदत घेते. चंद्रू मानवी हक्कांच्या प्रकरणांकडे विशेष लक्ष देतात. पण या प्रकरणाचा तळ गाठताना कोणते घृणास्पद सत्य त्यांच्या समोर येते, ही या चित्रपटाची कथा आहे. असे एक सत्य, जे शतकानुशतके आपल्यासोबत आहे. आपण फक्त सोयीस्करपणे त्याच्यापासून नजर फिरवली आहे आणि दुर्लक्ष केले आहे. 

केवळ पोलिसांच्या क्रूरतेचा किंवा अत्याचाराचा विषय म्हणजे 'जय भीम' नाही. तर ज्या मानसिकतेतून पोलिसांच्या क्रूरतेसारख्या हिंसाचाराचा जन्म झाला आहे, त्या मानसिकतेत शिरण्याचा प्रयत्न म्हणजे जय भीम . जय भीमचे कथानक त्या सर्व चालीरीतींना पुढे आणते,ज्यांनी विषमता किंवा आपण एकमेकांपेक्षा वरचे आहोत हा विषम  विचार करण्याचा अधिकार देतात. या प्रकारच्या विषमतेवर किंवा भेदभाव या विषयावर भाष्य करणारे याआधीही चित्रपट चर्चेत आले आहेत.


पण 'जय भीम' मध्ये हा विषय अत्यंत प्रभावीपणे समोर सरळ आणि स्पष्ट ठेवण्यात आला आहे. इतका सोपस्कर की, यातील दृश्य बघताना आपण या समाज व्यवस्थेमध्ये अनेक गोष्टी सोयीस्कररित्या दुर्लक्षित करतोय याची प्रेक्षकांना चांगलीच जाणीव होते. 

जसे की,राजकनू साप पकडण्याचे काम करतो. एकदा गावातील प्रभावशाली माणसाचा नोकर त्याला बोलावायला येतो. त्याला त्याच्या मोपेडवर बसायला सांगतो. बसलेला असताना राजा आधार घेण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तर तो डोकावून मागे वळतो. राजा आपली चूक सुधारून हात मागे घेतो.

जय भीम मध्ये राजा आणि त्याचा जात परिवार उंदीर खाऊन आपला उदरनिर्वाह करतात उदरनिर्वाह करतात. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये शूद्रातिशूद्र आदिवासी समुदायाला इतके अधिकार वंचित केले आहे की, शेवटी त्यांना उंदीर खाऊनच जगावे लागते .उंदीर खातात म्हणून अप्रामाणिक आहे असं नव्हे. तर आपल्याकडे आहारावरून समाजाची गुणवत्ता ठरवली जाते.परंतु; आहारावर गुणवत्ता ठरत नाही हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले आहे आणि या चित्रपटावरून देखील हेच दिसते. 

चित्रपटातील पोलिसांच्या अत्याचाराची दृश्ये सर्वात जास्त अस्वस्थ करणारी आहेत. ती दृश्ये तुम्ही प्रेक्षक म्हणून पाहत असाल तर एक गिल्ट तुम्हाला आतून नक्की खाईल ते म्हणजे तुम्ही अक्षरशः मौन धारण करून समाज व्यवस्थेत एकप्रकारे अत्याचार करणाऱयांना पाठीशी घालत आहात. विशेष म्हणजे या चित्रपटातील काही दृश्य अशी आहेत जी बघितल्यावर त्या आदिवासींच्या वेदना जाणवल्याशिवाय राहाणार नाही. जे कोणालाही अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे आहे. खरं तर वातावरण निर्मितीसाठी चित्रपटाच्या छायांकनालाही इथे श्रेय द्यायलाच हवे.

जर तुम्ही संपूर्ण चित्रपट पाहिलात, तर तुमच्या लक्षात येईल की चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी कथानकासोबत अत्यंत प्रभावी चालते. अगदी चंद्रू आणि आयजी पेरुमलसामी यांनी निभावल्या भूमिकेप्रमाणे प्रमाणे, ज्याची भूमिका सूर्या आणि प्रकाशराज यांनी साकारली आहे.


चित्रपटाच्या सुरुवातीला दोन्ही पात्रांची विचारसरणी एकमेकांपासून उत्तर-दक्षिण दिशेने सरकते तर एका सीनमध्ये दोघेही समोरासमोर कारजवळ उभे आहेत. अशा स्थितीत गाडीच्या दुसऱ्या बाजूला कॅमेरा लावला होता. जेणेकरून फ्रेममध्ये चंद्रू आणि पेरुमलसामी समोरासमोर दिसू शकतील आणि त्यांच्या दरम्यान वाहनाच्या खिडकीची चौकट अडथळा म्हणून दर्शविली जाऊ शकते. जणू दोन्हीचा विचार योग्य आहे. त्यांच्या विचारसरणीत फक्त फरक आहे. पुढे दोघांच्या विचारसरणीतील हा फरक मिटायला लागतो. अशा सीनमध्ये दोघे एकाच कारमध्ये बसलेले दाखवले आहेत. तेही एकमेकांच्या शेजारी.

जरी चित्रपटातील सर्वात मोठे नाव सुर्या होते. पण इथे तो चित्रपटाचा सर्वात मोठा स्टार होऊ शकत नाही. या चित्रपटाचा खरा चेहरा सेंगानी आहे. म्हणजे राजकनुची पत्नी. लिझो मॉल जोसने हे पात्र साकारले आहे. राजकनु तुरुंगात गेल्यावर कथेचा भार सेंगनीवर पडतो. जी तिने उत्तमरीत्या पार पाडली आहे. एकंदरीत अभिनयाचा विचार करता तिच्यासमोर सूर्या आणि प्रकाशराजसारखे बडे अभिनेते होते. पण तरीही तिने तिच्या वेगळेपणाची चुणूक भूमिकेतून दाखवली आहे.


जय भीम हा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
चित्रपटाला मास अपील देण्यासाठी काही भाग नाट्यमय करण्यात आले आहेत. ज्यांची फार  गरज वाटत नाही. यामुळेच चित्रपट काही भागांमध्ये संथ वाटू शकतो. पण याचा अर्थ हा चित्रपट सरळसरळ नाकारला जावा असे अजिबात नाही. आता चित्रपट म्हटले की गाणी,अश्लील शब्द, अंगप्रदर्शन हे विषयाच्या अनुषंगाने ठरलेले आहे.  हल्ली त्याशिवाय चित्रपट पूर्ण होत नाही. प्रेक्षकांनाही ते आवडते असा निर्माता आणि दिग्दर्शकांचा गोड गैरसमज आहे परंतु या चित्रपटाने चित्रपटसृष्टीतले हे सगळे गैरसमज बदललेले आहेत.  चित्रपट जसे मनोरंजन करण्याचे माध्यम आहे तसेच ते प्रबोधनाचे तसेच अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढा देण्याची प्रेरणा निर्माण करणारे एक शस्त्र होऊ शकते हाच एक संदेश जय भीम मधून मिळतोय . 


या चित्रपटात कुठलेही अंगप्रदर्शन नाही, अश्लीलता नाही आणि विशेष म्हणजे कुठलाही भपकेबाजपणा यात दाखवलेला नाही. यात एक सहजता आहे, प्रबोधन आहे आणि एक प्रेरणा आहे. 

याच विषयावर या अगोदरही चित्रपट बनवण्यात आलेले आहेत परंतु त्या चित्रपटांची जय-भीम सारख्या चित्रपटांची तुलना करणे हे शहाणपणाचे लक्षण ठरणार नाही. अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. 




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *