त्यांच्या साक्षीनेच आपण शंभर रुपये लिटरने पेट्रोल भरताहेत - अजित पवार
मुंबई -
कोरोनाच थैमान चालू असताना आता देशातील वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाला चिमटा काढला. पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यासह राज्यातील लसीकरण, जागतिक निविदा, भारत बायोटेकला जागा देणे, जयंत पाटील यांची नाराजी तसेच मराठा आरक्षण यांसह विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देत असतानाच अजित पवार यांना लसींच्या प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवारांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिले आहे. पुण्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,”भारत बायोटेकने पुणे जिल्ह्यात २० एकर जमीन मागितली आहे. त्यांना लसीच्या उत्पादनासाठी ही जमीन हवी असून, त्यांना जमीन देण्याच्या सूचना तातडीने देण्यात आल्या आहे. त्यांच्या लसीचे उत्पादन सुरू व्हायला ३ महिने लागतील. परंतु त्याआधी त्यांना आवश्यक गोष्टी उपलब्ध होतील.
जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी तिथं भेट दिली. तिथं लाईट, पाणी वगैरे सुविधा तत्काळ दिल्या जात आहे. ही लस नियमानुसार सर्वत्र पुरवली जाईल. पण पुण्याला ही लस मिळावी यासाठी मी अधिकार्यांना प्रयत्न करायला सांगितले आहे. असे अजित पवार म्हणाले. तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे. पण त्याचबरोबर ऑक्सिजन किती आला आणि कुठल्या राज्याला किती देण्यात आला हे पारदर्शकपणे केंद्र सरकारने सांगायला हवे. ग्लोबल टेंडर काढण्यासाठी पालिकेला राज्य सरकार परवानगीची गरज नसते. पालिकेने स्वत टेंडर काढायचे असतात. मुंबई महापालिकेनेही ग्लोबल टेंडर काढले आहे. पुणे पालिकेचे गटनेते चुकीची माहिती देत आहेत. म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणारी औषध मिळावीत यासाठी सोमवारी मुंबईत बैठक घेणार आहे.
कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून, त्यावरून अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. लोकं त्याबद्दल नाराजीही व्यक्त करत असल्याचे म्हटल्यानंतर अजित पवारांनी याला उत्तर दिले. “जाऊ द्या आता त्याला काय… पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो. आता करता करणार काय? तिथे फोटो याच्यासाठी असेल की, शंभर रुपये लिटरने तुम्ही पेट्रोल भरताहेत, तर त्यांच्या साक्षीने आपण भरतोय,” असे पवार म्हणाले. तुमच्यासाठी पण त्यांचा फोटो असेल का? असे प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले,’मी काय वेगळा लागून गेलोय का? तुमच्या माझ्यासहीत सर्वच नागरिकांच्या प्रमाणपत्रावर असणार. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत म्हणून त्यांनी ते आणलंय. त्याची पब्लिसिटी किती करावी? आम्ही प्रमाणपत्र देताना कुणाचेही फोटो.. तसले काही नाही केलेलं. माणसांना यातून कसं बाहेर काढता येईल, असा विचार केला पाहिजे. असे अजित पवार म्हणाले.
No comments
Post a Comment