आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याच्या १२ दिवसांनंतर ते मायदेशी परतले
मुंबई -
बायो बबल मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला ही स्पर्धा स्थगित करणे भाग पडले होते. त्यानंतर परदेशी खेळाडू, त्यातही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी कसे पाठवायचे? हा बीसीसीआयपुढे प्रश्न होता. भारतामध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली. त्यामुळे बीसीसीआयने ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकांना मालदीव येथे पाठवण्याची व्यवस्था केली होती. मागील काही दिवस ते मालदीव येथेच थांबले होते. परंतु, आता रविवारी म्हणजेच आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याच्या १२ दिवसांनंतर ते चार्टर्ड विमानाने मायदेशी परत जाऊ शकतील.
यंदा १४ खेळाडूंसह एकूण ३८ ऑस्ट्रेलियन व्यक्ती या आयपीएलमध्ये सहभागी झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक स्थगित केल्यामुळे त्यांना मायदेशी परतणे अशक्य झाले. मात्र, बीसीसीआयने त्यांची मालदीव येथे व्यवस्था करून दिली होती. आता त्यांना मायदेशी परण्यातची संधी मिळू शकेल. 'आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ३८ ऑस्ट्रेलियन लोकांना १६ मे रोजी चार्टर्ड विमानाने मालदीवहून आधी मलेशियाला आणि मग मलेशियाहून ऑस्ट्रेलियामध्ये नेण्यात येईल. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक असणार आहे,' अशी माहिती एका क्रिकेट वेबसाईटने दिली. ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत हवाई वाहतूक स्थगित केली आहे. परंतु, हा कालावधी वाढवण्यात येणार का, याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआयला माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाची आणि परवानगीची ते वाट पाहत आहेत. आयपीएलचा स्पर्धेचा यंदाचा मोसम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला होता. मात्र, उर्वरित मोसम यावर्षीच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
No comments
Post a Comment