उन्हाळ्यात आंब्याचा रस खाण्यासोबत चेहऱ्यावर पण लावा कांती उजळेल
मुंबई -
आंबा आवडत नाही, अशी व्यक्ती क्वचितच सापडते. चेहरा तजेलदार, चमकदार करण्यासाठी आंब्याचे अनेक उपाय आहेत. त्यामुळे आंबा खाल्ल्याने आणि त्याचा रस चेहऱ्याला लावल्याने तुम्ही तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता. वाचा कसे ते उन्हाच्या दिवसांत फळांचा राजा बाजारात सहज मिळतो. चेहऱ्यावरील टॅनिंगची समस्या दूर होण्याकरिता आंब्याचा फेस पॅक किंवा आंब्याचा रस चेहऱ्याला लावून चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता.
उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंगची समस्या निर्माण होते. याकरिता आंब्यापासून तयार केलेला फेसपॅक वापरू शकता. त्याकरिता 2 चमचे पिकलेल्या आंब्याचा रस (मॅंगो पल्प), 2 चिमूटभर हळद, 1चमचा गव्हाचे पीठ या सर्व वस्तूंची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 25 मिनिटे चेहरा आणि मानेला लावून ठेवा. यामुळे उन्हामुळे काळवंडलेली त्वचा तजेलदार व्हायला मदत होईल.
चेहऱ्यावरील डेड सेल्स निघून जाऊन त्वचा उजळ होण्याकरिता 2 चमचे आंब्याचा रस, 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा बदामाची पूड घ्या. (याकरिता 4 बदाम आणि 1 चमचा तांदूळ एकत्र बारिक करून ठेवा.) हे सर्व मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा, मान ओल्या कापडाने स्वच्छ पुसून काढा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा. 10 मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करा. मसाज करून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्वचा उजळ व्हायला मदत होईल.
त्वचेचा ग्लो नैसर्गिकरित्या वाढण्याकरिता आंब्याच्या पल्पचा (रस) उपयोग होतो. याकरिता 2 चमचे आंब्याचा रस, 1 चमचा दुधाची साय, 1 चमचा बेसन हे तीनही पदार्थ एकत्र करून 20 ते 25 मिनिटे त्वचेला लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे सात दिवसांत त्वचेचा ग्लो वाढतो.
आंबा खाण्याचे फायदे -
उन्हाळ्यात दिवसांत आंबा खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहतेच, तसेच याचा त्वचेवरही परिणाम होतो. जेवताना आंबा खाल्ल्याने उष्णतेचे विकार होत नाहीत. आंब्यात बीटा कैरोटिनॉइडस आणि जीवनसत्त्व ए याच्यासह बरेच पौष्टिक घटक असतात. यामुळे त्वचा उजळ व्हायला मदत होते. वजन कमी असलेल्यांनी आंबा खाल्ल्यानंतर 2 तासांनी कोमट दूध प्यावे. यामुळे थकवा, अशक्तपणा कमी होऊन वजन वाढायला मदत होईल. याबरोबरच कच्च्या कैरीचं पन्ह, कैरीची चटणी, आंब्याचे लोणचे याचा शरीर तंदरुस्त राखण्याकरिता आहारात समावेश करावा. यामुळे उन्हाळ्यात होणारे त्रासही दूर होतात.
No comments
Post a Comment