सारिपाट - ‘सिंघम’ कृष्णप्रकाश ‘यासाठी’ झाले जमालखान पठाण
सारिपाट / शिवाजी शिर्के -
आपल्या धडाकेबाज कारवाईने संपूर्ण राज्यातील तरुणाईसह सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वेषांतर करत सामान्य जनतेला पोलिस कशी वागणूक देतात हे जाणून घेतलं! पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त असणार्या कृष्णप्रकाश यांची नगर जिल्ह्यातील कारकिर्द जोरदार गाजली. नगरमधील कॉंग्रेसचा तत्कालीन अध्यक्ष भानुदास कोतकर याच्यासह भाजपाचा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुसक्या आवळून त्यांनी व्हाईट कॉलर गुंडागर्दी संपुष्टात आणली होती. मध्यंतरी मुंबईत सेवेत असलेले कृष्णप्रकाश हे सध्या पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आहेत. अवैध व्यावसायिकांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्यांची पिंपरी चिंचवड परिसरात सध्या पाचावर धारण बसली आहे. गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणारे आयुक्त कृष्णप्रकाश हे सामान्य जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेत कायम दिसले. मात्र, आपले पोलिस दल सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेते किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांनी वेषांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत सहायक पोलिस आयुक्त असणार्या प्रेरणा कट्टे यांनीही वेषांतर केले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चेहर्यावर दाट झुबकेदार दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग लावून त्यावर पांढरी गोल टोपी परिधान केली. सलवार कुर्ता आणि मास्क असा वेष परिधान करून आयुक्त बनले जमालखान कमालखान पठाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे बनल्या त्यांच्या बेगम. वेषांतर केलेले हे पठाण दांपत्य पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर उतरले. सुरुवातीला आयुक्तांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. ‘आमच्या शेजार्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल आठ हजार रुपये सांगितले’, अशी तक्रार त्यांनी केली. नियंत्रण कक्षातून ही माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आली. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाण्याऐवजी तक्रारदार पठाण यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
मध्यरात्री सव्वाबारा वाजता हे कथीत पठाण दांपत्य पिंपरी पोलीस ठाण्यात खासगी टॅक्सी करून गेले. ‘रुग्णवाहिकावाला आम्हाला लूटतोय, आमची तक्रार दाखल करून घ्या’, अशी मागणी या पठाण दांपत्याने केली. त्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात असलेल्या पोलिसांनी पठाणयांना ‘हे आमचे काम नाही’ असे म्हणून झिडकारले. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अशी वागणूक देत असल्याने पठाण झालेले पोलीस आयुक्त संतापले. त्यांनी तात्काळ आपली ओळख दाखवत संबंधित पोलिसांना विचारणा केली. हा वाईट अनुभव घेऊन पठाण दांपत्याने पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन करून वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दांपत्य असल्याचे सांगितले.
हिंजवडी पोलीस ठाण्यात मध्यरात्री दीड, तर वाकड पोलीस चौकीत मध्यरात्री दोन वाजता पठाण दांपत्य
झालेल्या आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी भेट दिली. हिंजवडी पोलीस स्टेशन आणि वाकड पोलीस चौकीत या पठाण दांम्पत्याने आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा आम्हाला त्रास होतो. आम्ही काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली.मला कंबरेत
लाथा घातल्या. आमची झटापट झाली त्यात एकाचा मोबाईल माझ्या हातात आला आहे’ अशी तक्रार केली.
या ठिकाणी उपस्थित पोलीस कर्मचार्यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कच्ची फिर्याद तयार केली. वरिष्ठांना बोलावून ते येईपर्यंत थांबण्याची विनंती देखील केली. पोलिसांनी दिलेल्या या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे पोलीस आयुक्तांना जरा हायसे वाटले. त्यानंतर त्यांनी आपली ओळख दाखवून पोलीस कर्मचार्यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित असलेले पोलीस मात्र कावरेबावरे होऊन पाहत राहिले.
याबाबत नक्की काय घडले याची माहिती आपण जाणून घेऊ यात! आपल्याशी सध्या थेट जोडलेले आहेत पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश! सर नमस्कार.... पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त म्हणून तुम्ही करीत असलेले काम आणि त्यातून गुन्हेगारांवर बसलेली जरब मोठी आहे. नगरमध्ये असताना आपण भयमुक्त नगरचा नारा दिला होता आणि तो आपण यशस्वीही केला! तोच नारा सध्या आपण पिंपरी चिंचवडमध्ये दिलेला दिसतोय! दोन दिवसांपूर्वी आपण वेषांतर करून पोलिस ठाण्यात सामान्य जनतेला काय आणि कशी वागणूक मिळते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नक्की काय घडलं होतं असं? पोलीस आयुक्त असणार्या कृष्णप्रकाश यांनी जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांचा वेष परिधान केला. यातून संबंधित समाजाला आणि एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांना पोलीस कशी वागणूक देतात, याची पाहणी करण्याचा आयुक्तांचा उद्देश होता. पिंपरी पोलीस ठाण्यात आलेल्या अनुभवाने मात्र आयुक्त संतापले. पीडित नागरिकांनी मदतीसाठी फोन केल्यावर घटनास्थळी जाणे क्रमप्राप्त असताना देखील पिंपरी पोलिसांनी पीडितांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते.
पोलिसांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून झटणारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे आता पोलिसांना काटेकोर शिस्त लागावी यासाठी अशा वेषांतर करून धाडी टाकत आहेत.
शहरात अवैध धंदे करणान्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. अवैध धंद्यांवर दररोज कारवाया होत आहेत. यामुळे अवैध धंदे करणारे आणि त्यांना अभय देणार्या व्हाइट कॉलर लोकांनी देखील पोलीस आयुक्तांचा धसका घेतला आहे. मात्र नागरिकांवर कारवाई करत असताना पोलीस दलात देखील शिस्त, प्रामाणिकपणा असणे आवश्यक असल्याने आता पोलीस ठाण्यांवर आणि पोलिसांच्या कामावर धाडी टाकण्याचे काम पोलीस आयुक्त करीत आहेत.
पोलिस आयुक्त असणारे कृष्णप्रकाश हे नगरमध्ये पोलिस अधीक्षक होते. त्यावेळी त्यांनी नगर शहरासह संपूर्ण जिल्हा भयमुक्त केला होता. तोच पॅटर्न सध्या तरी ते पिंपरी चिंचवडमध्ये राबवत असल्याचे दिसते. खरेतर कोणत्याही अधिकार्याने त्याच्या कार्यक्षेत्रात असे काम केले तर जनतेमध्ये आणि जनतेसाठी प्रशासन कसे काम करते हे दिसून येईल आणि त्यातून प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल. कृष्णप्रकाश यांनी केलेल्या कामाचे त्यामुळेच कौतुक केले पाहिजे!
No comments
Post a Comment