राज्यानेही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई -
गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा आरक्षण टिकविण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली आहे. 102 च्या घटनादुरुस्तीसंदर्भात फेरविचार करण्यासाठी अशीच याचिका राज्यानेही दाखल करावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टानं निर्णयामध्ये आरक्षण बहाल करण्याचा अधिकार राज्याला नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांच्या मार्फत करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी केंद्र सरकारने तातडीने सुप्रीम कोर्टामध्ये 102 व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात फेरविचार करण्यासंदर्भातील याचिका दाखल केली. हा विषय राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकारांशी निगडीत आहे. त्यामुळे राज्य सरकारनंही यावर तातडीने फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी खासदार संभाजीराज छत्रपती यांनी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी या पत्रामध्ये 102 च्या घटनादुरुस्तीमधील तरतुदीचाही उल्लेख केला आहे. या घटनादुरुस्तीशी संबंधित 25 सदस्यांच्या समितीने अहवालात याविषयी माहिती दिली होती. या अहवालात 12 व्या तरतुदीमध्ये असे नमूद केले आहे की, या घटनादुरुस्तीमुळे राज्य मागासवर्ग आयोगांना मागास यादीत एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्याचा अधिकार बाधित होत नाही. हा मुद्दा केंद्राच्या वतीनं सुनावणीदरम्यान मांडण्यात आला होता, असेही संभाजीराजे यांनी सांगितले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वीही आता ठोस भूमिका घेत पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी याबाबत ट्विट केले होते. आता या पत्राद्वारे त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
No comments
Post a Comment