सारिपाट / शिवाजी शिर्के…. काळजी घेतली नाही तर आमदार लंके यांचे ‘ते’ सेंटर कोरोनाचे सुपरस्प्रेडर सेंटर होणार
सारिपाट / शिवाजी शिर्के -
नगर जिल्हा सध्या चांगलाच गाजतोय! त्यातही गाजतेय ते राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे अकराशे बेडचे कोवीड सेंटर! त्याखालोखाल दोन दिवसांपासून गाजतेय ते नगर शहरातील कोवीड लसीकरण केंद्रावरील गलथान नियोजन! हॉस्पिटलमधून रुग्णांची लूट होऊ नये यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने प्रत्येक हॉस्पिटलवर शासकीय कर्मचारी नियुक्त केला गेला! या कर्मचार्याच्या सहीने रुग्णाचे बील अंतिम करायचे आणि त्यानंतर नातेवाईकांनी हे बील द्यायचे असा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला असला तरी त्या अनुषंगाने नक्की काय कार्यवाही होतेय या अनुषंगाने भाष्य करण्या आधी आपण यासंबंधीचे काही व्हीडीओ पाहू यात! पहिला व्हिडीओ आहे नगर शहरातील लसीकरण केंद्रात झालेल्या गर्दीचा! महापालिकेतील महापौर, उपमहापौर यांच्यासह सर्वच नेते आणि नगरसेवकांनी दोन दिवस आधी सोशल मिडियाच्या माध्यमातून नगरमध्ये कोरोना प्रतिबंधक लस आली असून त्याचे नियोजन नगरमध्ये कसे केले आहे याच्या पोस्ट व्हायरल केल्या! या पोस्ट इतक्या व्हायरल झाल्या की लोकांनी पहाटे चारपासूनच संबंधीत लसीकरण केंद्रासमोर रांगा लावल्या!
ज्यांनी पोस्ट टाकल्या ते सारे नामानिराळे राहिले! गर्दीला आवर घालायला कोणीच पुढे आले नाही! उलट प्रशासन कसे ढीम्म आहे आणि आम्ही कसे तुमचे कैवारी आहोत हे दाखविण्याची संधी बहुतांश नगरसेवकांनी आणि पदाधिकार्यांनी साधली!
महापालिकेने मंगळवारी घोषणा करत ज्यांना लस देण्यात येणार आहे, त्यांना अगोदर मेसेज दिला जाईल, तसेच त्यांची नावे लस केंद्राबाहेर लावले जातील, अशी घोषणा केली असली तरी दुसर्याच दिवशी ही घोषणा हवेत उडाली. अशी कोणतीही कार्यवाही न करण्यात आल्यामुळे दुसर्या दिवशीही लस केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. माळीवाडा लस केंद्रावर महापालिका अधिकार्यांना नागरिकांनी जाब विचारला. लस मिळावी, यासाठी शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर गर्दी होणे ही नित्याची बाब झाली. अनेकदा यास महापालिकेचा ढिसाळ कारभार कारणीभूत ठरला आहे. आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे योग्य नियोजन नसल्याने सातत्याने गर्दीचा उच्चांक होत होता. लसीकरण केंद्रावरील कर्मचार्यांशी वाद होणे, भर उन्हात रांगा लावणे, अन काही वेळानंतर लस संपल्याचे ऐकल्यानंतर संताप व्यक्त करणे, असे प्रकार सातत्याने सुरू होते. गेल्या अनेक दिवसांनंतर आलेली कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठी मंगळवारी अशीच प्रत्येक केंद्रावर गर्दी उसळली. पहाटे पाचपासून लोकांनी रांगा लावल्या आणि लसीकरण सुरू होण्यापूर्वीच त्यांचा हिरमोड झाला. केंद्रावर पाचशेपेक्षा जास्त लोक आणि लस मात्र फक्त तीस, चाळीस अशी स्थिती होती. यातून अनेक ठिकाणी वादही झाले. दुपारी महापालिकेला कोव्हॅक्सिनचे अतिरिक्त साडेसहाशे डोस मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र लसीकरण केंद्रावर ते पोहोचलेच नाहीत. सकाळी तीस-चाळीस डोस दिल्यानंतर नागरिकांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर कोणालाही लस देण्यात आली नाही. त्यामुळे अतिरिक्त मिळालेले साडेसहाशे डोस गेले कुठे, याचे उत्तर मिळालेच नाही.
आयुक्त शंकरराव गोरे यांनी लसीकरणाचे नियोजन करण्याचे ठरविल्यानुसार यापुढे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. मागील डोसची तारीख पाहून दुसर्या डोसची नावे निश्चित करण्यात येतील. संबंधितांची नावे महापालिकेच्या वेबसाईटवर आणि लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात येतील. तसेच त्या नागरिकांना मेसेज देण्यात येतील. त्यांच्याशिवाय इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे सांगण्यात आले. आरोग्य विभागाकडून याची कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र बुधवारी दुसर्याच दिवशी ही कार्यवाही झाली नाही. अनेक केंद्रावर नागरिकांनी पुन्हा गर्दी केली. त्यांना ना कोणते मेसेज गेले, ना लसीकरण केंद्राबाहेर यादी लागलेली ना वेबसाईटवर कोणती नावे पडलेली. फक्त लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आले होते. ज्यांना टोकन नाही, त्यांनी घरी जायचे, असे सांगण्यात आले. गेली दोन दिवस लसीकरण केंद्रावर लस मिळायला तयार नाही! मात्र, कोरोना सुपरस्प्रेडर येथे येऊन जात आहेत. अनेक जण या केंद्रावर रेंगाळलेले, विनामास्क, तंबाखू- गुटखा खाऊन टिंगलटवाळी करत बसलेले दिसतात! हे सारेच भयानक आहे. यात काही नगरसेवक अथवा त्यांचे कुटुंबियही दिसतात हे विशेष! यात आणखी एक धक्क़ादायक प्रकार समोर आला तो म्हणजे लसीकरण केंद्रातील महिला कर्मचार्यांची पळवपळवीच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने केली. महापालिकेचे अधिकृत लसीकरण केंद्र नसलेल्या ठिकाणी या लसी नेण्यात आल्या आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारीही! अनधिकृत लसीकरण केंद्र असल्याने आम्ही येथे लसीकरण करणार नसल्याचा पवित्रा कर्मचार्यांनी घेताच त्यांना धमकावण्यात आले! मनमाड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये प्रभागातील नागरिकांना लसीकरण करण्याचा या नगरसेवकाचा अट्टाहास होता!
प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना सुरू केलेले हे लसीकरण केंद्र आता वादात अडकले आहे. महापालिकेच्या कर्मचार्यांना तेथे खासगी वाहनातून नेण्यात आले हेही भयानकच! लसी पळविण्याच्या जोडीने लसीकरण करणारा महापालिकेचा स्टाफ पळविण्यापर्यंत मजल जात असेल तर नगरची वाटचाल बिहारच्या दिशेने झालीय असेच म्हणावे लागेल. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हे लसीकरण केंद्र सुरू कसे होते, तेथे राजकीय दबावातून कर्मचारी कसे नेले जात असल्याचे कामगार संघटनेचे नेते अनंत लोखंडे व आनंद वायकर यांनी सांगितलं आहे. या केंद्रावर आता पुढे लसीकरण होणार नाही, असे अनंत लोखंडे यांनी जाहीर केेले असले तरी कामगारांना पळवून तेथे नेले त्याचे काय? महापालिका कामगार युनियनची भूमिका दुटप्पी असल्याचेच यातून दिसून येते. यापेक्षा किरकोळ प्रकरणात याच कामगार युनियनने काम बंद आंदोलनासह काही राजकीय व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा अट्टाहास धरला! मग आता ही संघटना गप्प का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो! कामगार संघटना कोणत्या राजकीय दबावाखाली आहे याचे उत्तर कामगार नेत्यांनाच द्यावे लागणार आहे. तिसरा अत्यंत भयानक दरोडेखोरीचा प्रकार सध्या काही हॉस्पिटलमधून नगरमध्ये चालू आहे. राज्य शासनाने आदेशीत केल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्यांनी दि. ३० एप्रिल रोजी आदेश काढला. हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोना बाधीत रुग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वी द्यावे लागणार्या बिलांची शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार तपासणी करण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी तब्बल ५० पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या कर्मचार्यांना दाखवून आणि त्यांनी तपासणी केल्यानंतर व त्यांच्या सहीनंतर हॉस्पिटल प्रशासनाने बीलांची वसुली करणे अपेक्षीत आहे. मात्र,यातील एकाही कर्मचार्याची सही कोणत्याही हॉस्पिटलने घेतली नाही.
या कर्मचार्यांच्या पुर्ण वेळ ड्युट्या या हॉस्पिटलमध्ये लावण्यात आल्या! मात्र, या कर्मचार्यांना हॉस्पिटलमध्ये साधी बसण्याची व्यवस्था केली जात नसल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. त्याहीपेक्षा आयुक्तांनी कागदी घोडे नाचवून आपण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची किती काळजी घेतोय हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असंच म्हणावे लागेल! अकराशे बेडचे कोविड सेंटर, त्याठिकाणी दिल्या जाणार्या सुविधा, रुग्णांना दिले जाणारे जेवण, केले जाणारे उपचार यामुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे थेट प्रकाशझोतात आले. खरेतर सामान्य कुटुंबातून पुढे आलेले हे तरुण नेतृत्व आणि त्यांच्याकडून उपेक्षीतांसाठी केले जाणारे काम कौतुकास्पदच आहे. कोवीड सेंटरमध्ये जाण्यास अनेकजण घाबरतात! मात्र, आमदार लंके या सेंटरमध्येच मुक्काम ठोकतात! हा मुक्काम देखील कार्यकर्त्याच्या बाजूला सतरंजी टाकून! कार्यकर्त्याच्या जोडीने कोविड रुग्णांच्या सोबत जेवण घेणारा हा आमदार त्यामुळेच सर्वांच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला! आमदार लंके यांच्या या कार्याची दखल दस्तुरखुद्द शरद पवार यांना घ्ंयावी लागली आणि त्यांच्यासह अजितदादा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदींनीही त्यांचे कौतुक केले.
मात्र, हे कौतुक करताना या सर्वांनी निलेश लंके यांना काळजी घेण्याचं आवाहनही केले. विनामास्क ते कोवीड सेंटरमध्ये फिरत असल्याचे पाहून या सर्वांना जशी काळजी वाटली तीच काळजी आम जनतेलाही वाटते! सामान्य कुटुंबातील हे नेतृत्व यापुढेही भेटावं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागावी हीच त्यामागची भूमिका! कोरोना संसर्ग कोणालाही होऊ शकतो, त्यास निलेश लंके अपवाद कसे होऊ शकतात! त्यांच्यासह समर्थकांचा दावा काहीही असो, पण काळजी घेतलीच पाहिजे! कोवीड सेंटरच्या माध्यमातून चांगले काम होत असताना हे कोवीड सेंटर आता इव्हेंट सेंटर होऊ लागले आहे. त्यातूनच आपला नेता विना मास्क फिरतोय, मग मी का नाही अशी भूमिका घेऊन काहीजण गावोगावी कोरोनाचे सुपर स्पे्रडर झाले आहेत काय याची तपासणी होण्याची आवश्यकता आहे. आमदार लंके यांना मिळत असलेली प्रसिद्धी पाहून काही अशिक्षीत आणि काही भोंदू महाराज त्या कोवीड सेंटरला भेट देऊ लागलेत! सोशल मिडियावर एक व्हीडीओ आलाय! तो आपण आधी पाहू आणि कोरोना संसर्ग यांना रोखायचा आहे की वाढवायचा आहे या विषयावर बोलू! अत्यंत भयानक असा हा प्रकार म्हटला पाहिजे! आमदार लंके यांना विनामास्क फिरण्याचे देवदेवतांचे लायसन मिळाले आहे असे आपण समजू! पण, सोबत असणार्यांचे काय? पारनेर तालुक्याचे उदाहरण घ्यायचे तर सुमारे महिनाभरापासून तालुका लॉकडाऊन आहे! तरीही रोजची बाधितांची संख्या चारशेच्या घरात कशी? प्रसिद्धीचे स्टंट करण्यासाठी कोरोना प्रोटोकॉलचे धिंडवडे उडवले गेले आहेत आणि हे वास्तव सत्य आहे. याबद्दल प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधून बघ्याची भूमिका घेतली आहेच. एक अशिक्षीत महाराज आणि सोबतीला भोंदू डॉक्टर आणि त्यांनी एका कोरोना पेशंट असणार्या महिलेच्या हातावर घासून काहीतरी औषध दिले, म्हणजे व्हायरस हातावरून बाटलीवर आणि तीच बाटली इतर दोघांच्या हातावर घासून चाटण दिले. म्हणजे व्हायरस त्या बाटलीवरून इतर दोघांच्या हातावर.
कोवीड सेंटर आणि तेथील चांगल्या सुविधांच्या निमित्ताने राज्यभर गाजलेल्या निलेश लंके या कथीत देवमाणसाच्या समोरच या भोंदूंनी आणखी दोघांना कोरोनाचा प्रसाद वाटला आणि आमदार लंके हे सारे पाहत बसले! दैवीशक्ती असेलही आमदार लंके यांच्यात! पण, सोबतीला असणार्यांचे काय? तालुक्याच्या अनेक भागातून त्यांचे समर्थक रोज येथे येतात! त्यांच्यावर दिलेली जबाबदारी पार पाडतात आणि पुन्हा आपआपल्या गावात जातात! जाताना किती लोक सॅनीटाईज होतात! सुपरस्पे्रेडर नक्की कोण? दैवीशक्ती आणि आशीवार्द असल्याची चर्चा असणार्या आमदार लंके यांना काहीच होणार नाही हे एकवेळ आपण समजून घेऊ! पण, सोबत असणार्यांचे काय? सहवासात येणार्यांचे काय? या सार्या प्रश्नांची उत्तरे दस्तुरखुद्द आमदार निलेश लंके यांना कृतीतून द्यावी लागणार आहेत. कोव्हीड सेंटरच्या अनमोल आणि सामाजिक अशा कामातून राज्यातील जनतेच्या गळ्यातील ते ताईत झाले आहेत आणि ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे! मात्र, त्याजोडीने कोव्हीड सेंटरचे इव्हेंट सेंटर होऊन हेच सेंटर कोरोनाचे सुपरस्पे्रडर सेंटर होणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे इतकेच!
No comments
Post a Comment