विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळात एकाच डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा
मुंबई -
कोरोनाच्या महामारीनंतर भारतीय संघ येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाईल. न्यूझीलंडच्या संघाशी भारतीय संघ विजेतेपदासाठी झुंज देईल.
भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या प्रत्येक मालिकेत दमदार कामगिरी केली. आणि त्यामुळे पॉईंट्स टेबल मध्ये अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. यात सगळ्यात महत्वाचा वाटा होता तो गोलंदाजांचा. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीने भारतीय संघाला अंतिम फेरीत धडक मारणे शक्य झाले. या निमित्ताने आजच्या लेखात आपण अशा भारतीय गोलंदाजांचा आढावा घेऊया, ज्यांनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळात एकाच डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
३) इशांत शर्मा - (३ वेळा)
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करतो आहे. सध्याच्या भारतीय संघातील तो सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. नुकताच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्सचा टप्पा पण पूर्ण केला होता. त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पण भारतासाठी महत्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेअंतर्गत खेळवल्या गेलेल्या मालिकांमध्ये त्याने ३ वेळा एकाच डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
२) आर अश्विन - (४ वेळा)
आर अश्विन हा सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमधीलच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील देखील एक सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. अश्विनने नुकत्याच इंग्लंड विरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ४०० विकेट्सचा देखील टप्पा पार केला. मात्र अनेकदा त्याच्यावर परदेशात फारसा यशस्वी न ठरल्याचा ठपका ठेवला जातो. पण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याने हा ठपका पुसून काढत परदेशात देखील दमदार कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत ४ वेळा एकाच डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. अश्विन ६७ विकेटसह विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज पण आहे.
१) अक्षर पटेल - (४ वेळा)
खरंतर या यादीतील अव्वल स्थान वाचून धक्का बसेल. कारण या यादीत अव्वल स्थानी असलेल्या अक्षर पटेलने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत केवळ एक मालिका खेळली आहे. रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने अक्षर पटेलला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. मात्र या एकाच मालिकेत त्याने कमाल केली. या मालिकेत त्याने तब्बल ४ वेळा एकाच डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे तो या यादीत अव्वल स्थानी आहे.
No comments
Post a Comment