सचिन तेंडुलकरने वडिलांची कविता शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या
मुंबई -
महाराष्ट्र दिनाच्या सचिन तेंडुलकर यांनी शुभेच्छा दिल्या. राज्याला कोरोनाच्या संकटाने वेढा दिला असला, तरी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या आठवणींना उजाळा देत आज राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यानिमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या असून, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांची म्हणजेच रमेश तेंडुलकर यांची कविता शेअर करून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट् दिनानिमित्ताने सचिन तेंडुलकरने एक ट्विट केलं आहे. “आज महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या वडिलांची एक कविता सादर करत आहे. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!. असं म्हणत सचिनने कविता पोस्ट केली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर मंत्रालयात ध्वजारोहण केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांच्या त्यागाचे स्मरण करत त्यांनी अभिवादन केलं. तसेच महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “करोना संकटाविरुद्ध राज्य एकजुटीने, निर्धाराने लढत आहे. करोनाच्या संकट काळात राज्य शासनाचं सर्वोच्च प्राधान्य नागरिकांचे जीव वाचविण्याला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने नाईलाजाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्वांची एकजूट, निर्धार, संयम याच्या बळावर महाराष्ट्र लवकरच करोनावर मात करेल,” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
No comments
Post a Comment