17 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - तौक्ते चक्रीवादळाने घेतला रौद्रवतार...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 81 हजार 386 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 106 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
2. गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नागरिकांना आता गोमूत्र पिण्याची आणि गो पालन करण्याचं आवाहन केलं आहे. गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्रं घेते, त्यामुळेच मला कधी कोणतं औषध घ्यावं लागलं नाही. मला कोरोनाही झाला नाही, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
3. तौक्ते चक्रीवादळाने घेतला रौद्रवतार
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार धारण केला आहे. रविवारपासून चक्रीवादळाचं स्वरूप तीव्र होताना दिसत असून, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
4. “अजित पवारांनी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला”
हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला पुण्यात लस निर्मिती प्रकल्पासाठी जागा देण्यात आली असून, सरकारने २८ एकर जागा कंपनीला हस्तांतरित केली आहे. त्याचबरोबर आवश्यक यंत्रसामग्रीसह इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
5. सोलापूर, पंढरपुरात ढगाळ वातावरण
सोलापूर, पंढरपूरसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वारे वाहत होते. मात्र शनिवारी रात्री पंढरपुरात वादळी वाऱ्यासह पावसाने चांगली हजेरी लावली. तसेच सोलापूर शहरात देखील सोसाटय़ाचा वारा आणि पावसाने चांगलेच झोडपून काढले. शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना झाली. मात्र आधी पाऊस आणि नंतर ढगाळ वातावरण यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
6. शहापुरातील कुंडन गावातील गावकऱ्यांची आर्त हाक
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं सरकारनं जाहीर केलं खरं परंतु रेशनवरील हक्काचं धान्यही मिळत नसल्याने लेकरांना काय खाऊ घालायचं, असा प्रश्न शहापूर भागातील कुंडन गावातील गावकऱ्यांना पडला आहे.
7. शरद पवारांचा पहिला प्रश्न “बारामतीकर ठीक आहेत ना?”
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे शस्त्रक्रियेनंतर मुंबईत विश्रांती घेत आहेत. मात्र याही स्थितीत त्यांचं लक्ष बारामतीकडे असल्याचं एका प्रसंगातून पहायला मिळालं. बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी पवारांची मुंबईत भेट घेतली.
8. काँग्रेस कार्यकर्ते करण म्हेत्रेंच्या अंत्ययात्रेला गर्दी
सोलापुर येथे युवा नेते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला गर्दी करणाऱ्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंत्ययात्रेवेळी गर्दी करु नका असं सांगणाऱ्या पोलिसांनाच धक्काबुक्की झाली होती. करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला रविवारी हजारोंच्या संख्येने जनसुमदाय आला होता.
No comments
Post a Comment