16 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - आयआयटीच्या संशोधकांनी बनवली इकोफ्रेंडली 'मोबाईल शवदाहिनी'....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. श्वसनयंत्रांचा हिशेब हवा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोना परिस्थितीच्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेताना केंद्राने पुरवलेली श्वसनयंत्रे काही राज्यांत वापराविना पडून असल्याच्या प्रश्नाची गंभीर दखल घेतली आणि त्याच्या त्वरित लेखापरीक्षणाचे आदेश दिले. त्याचबरोबर कोणत्याही प्रतिकुल परिणामांची काळजी न करता राज्यांनी आकडे जाहीर करण्यात पारदर्शकता आणावी.
२. ‘व्हाइट हाऊस’च्या वरिष्ठ सल्लागारपदी नीरा टंडन
भारतीय अमेरिकी धोरणतज्ज्ञ नीरा टंडन यांची व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्ष जो बायडेन यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी व्हाइट हाऊसमधील अर्थसंकल्प व्यवस्थापन पदासाठी केलेला अर्ज रिपब्लिकनांच्या तीव्र विरोधामुळे दोन महिन्यांपूर्वी माघारी घेतला होता.रिपब्लिकनांनी परवडणारी आरोग्य सेवा कायदा रद्द केला होता.
३. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती.
४. बीडमध्ये ५ जूनला सरकार विरोधात मोर्चा – मेटे
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर समाजातून प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने तो रस्त्यावर येऊन उद्रेक होऊ नये यासाठीच राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या नावाखाली ३१ मे पर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता ५ जून रोजी कोणत्याही परिस्थितीत बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी दिली.
५. कोयना प्रकल्पाचे आज साठाव्या वर्षांत पदार्पण
महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प आज हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. १६ मे १९६२ रोजी कार्यान्वित झालेल्या महत्त्वाकांक्षी कोयना जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राला विजेचा झगमगाट देताना, औद्योगिकरणाला मोठी साथ केली. तर कृष्णा, कोयनाकाठ जलसमृध्द करताना लगतच्या दुष्काळी प्रदेशाचीही तहान भागवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
६. आयआयटीच्या संशोधकांनी बनवली इकोफ्रेंडली 'मोबाईल शवदाहिनी'
कोरोनामुळे देशात रोज हजारो नागरिक दगावत आहेत। स्मशानभूमींवरील ताण त्यामुळे बराच वाढला आहे ,याच पार्श्वभूमीवर आयआयटीच्या संशोधकांनी तो कमी करण्यासाठी एक प्रयत्न केला आहे. त्यांनी इकोफ्रेंडली 'मोबाईल शवदाहिनी' बनवली आहे. कमीत कमी लाकडांचा वापर करून त्यामध्ये अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. त्यात धूरही कमी होतो.
७. मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांत 75 लाखांचा दंड वसूल
राज्यात 'मिशन ब्रेक दि चेन' अंतर्गत संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपनगरीय लोकलमधून प्रवासाला अनुमती असल्याने अनेक जण विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून 1 ते 14 मेदरम्यान मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये 14,500 केसेस दाखल होत एकूण 75 लाखांचा दंड वसूल केला आहे.
८. द्वितीय सत्र परीक्षा जूनमध्ये
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तरच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहेत.15 जूनपासून टप्प्याटप्प्याने याबाबत नियोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी झाली. त्यात दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर या परीक्षा 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने घेण्यावर एकमत झाले. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.
९. समाजकंटकांनी शेतातील कांदा केला नष्ट
माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार जुन्नर तालुक्यात उघडकीस आल आहे.एकीकडे शेतकऱ्याचा कोरोनामुळे रुग्णालयात मृत्यू झाला असताना त्याच्या मागे शेतात काढलेल्या कांद्यावर काही समाजकंटकानी युरिया मिश्रित पाणी टाकल्याने मोठं नुकसान झालं आहे. राजुरी येथील ही घटना आहे. शेतकऱ्याच्या कांदा आरणीवर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने सर्व कांदा खराब होऊन 1 लाख 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
१०. वृद्ध आजी 2 दिवस अन्नपाण्याविना गोठ्यात
कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर संपुर्ण परिवाराला क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशाप्रकारेच एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना बीडमधून समोर आली आहे. संबंधित घटना ही बीड जिल्ह्यातील नाळवंडी याठिकाणी घडली आहे. घरातील सर्वजण कोरोनाबाधित असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. यादरम्यान, पाठीमागे घरात राहणाऱ्या वृद्ध आजीचे अत्यंत वाईट हाल झाले.
No comments
Post a Comment