16 मे सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला - शरद पवार....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. राजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीकडे रवाना
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट करुन सातव यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर, आता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ''राजीव सातव यांचं पार्थिव थोड्यात वेळात पुण्यातून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे.
2. अमित शहा- उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक
तौक्ते चक्रीवादळाचा गोव्याला मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे गोव्याची दाणादाण उडाली असून कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रालाही या वादळाचा धोका असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू केली आहे.
3. आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार
युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने स्पष्ट केलं आहे की एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात भरती न करणे किंवा औषधांची आणि उपचारांची सुविधा देण्यास नकार देणं या गोष्टी आता बंद होणार आहेत.
4. 'राजीवबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतात...', नाना पटोलें
खासदार राजीव सातव यांच्या निधनानं संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक पोकळीच निर्माण झाली असून, राज्य एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे अशा शब्दांत नेतेमंडळींनी त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात कोरोना वरील उपचार सुरु होते.
5. भारतविरोधी वार्तांकन करणाऱ्या जागतिक मीडियाला मॅथ्यू हेडनने खडसावले
भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा सामना करीत आहे. दररोज लाखो लोकांना या विषाणूची लागण होत आहे, तर हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. जगभरातली माध्यमं भारताच्या कोरोना परिस्थितीचं अतिशय तिखट वार्तांकन करत आहेत. याच माध्यमांना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने कठोर शब्दात सुनावलं आहे. 'अतुल्य भारताचा सन्मान करा', असा सल्ला त्याने जगभरातील माध्यमांना दिला आहे.
6. अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने,
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या 'तौत्के' चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
7. महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला -शरद पवार
राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून सातव यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली.
8. बीडमध्ये ५ जूनला सरकार विरोधात मोर्चा – मेटे
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर समाजातून प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने तो रस्त्यावर येऊन उद्रेक होऊ नये यासाठीच राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या नावाखाली ३१ मे पर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता ५ जून रोजी कोणत्याही परिस्थितीत बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी दिली.
9. राज्यातील रुग्णसंख्येत घट
राज्यातील करोना रुग्णसंख्येत घट होऊ लागली असून, दिवसभरात ३४,८४८ नवे रुग्ण आढळले तर ९६० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी झाली। रुग्णसंख्या कमी होत असतानाच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटू लागली आहे. राज्यात सध्या ४ लाख ९४ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ५९ हजार रुग्ण करोनामुक्त झाले.
10. गराडा परिसरात वाघिणीचा संचार,गावांना दिला सतर्कतेचा इशारा
भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळ टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुडून, वाघाच्या चार बछड्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. बछड्यांच्या मृत्यूमुळे ती हिंस्त्र होण्याची शक्यता असल्याने, तिचा शोध घेण्यासाठी वनविभागाने लावलेल्या ४ ट्रॅप कॅमेरात त्या ठिकाणी वाघीण येवून पाहत असल्याचे दिसून आले आहे.
No comments
Post a Comment