11 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - तरुणीला कोरोना लसीचे तब्बल 6 डोस एकाच वेळी तरीही...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
१. म्युकोरमायकोसिसच धोका वाढला, ठाकरे सरकार सावध;
कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस (mucormycosis) आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे आता ठाकरे सरकार कमालीचे सावध झाले आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
२. पुण्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश
रेमडेसिविर इंजेक्शनच्या अतिवापरामुळे कोरोना रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या पाहता आता पुण्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णाला (Coronavirus) अगदीच गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.
३. तरुणीला कोरोना लसीचे तब्बल 6 डोस एकाच वेळी दिले
कोरोनापासून बचावासाठी लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे . लसीकरणाशी संबंधित एक विचित्र बातमी समोर आली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लसीचे दोन डोस पुरेसे आहेत. मात्र, इटलीमध्ये एका 23 वर्षीय मुलीला नुकतेच फायझर-बायोटेक लसीचे 6 डोस दिले गेले आणि ते सर्व एकाच वेळी दिले.
४. अमेरिकेने दिली करोना मृतांची खोटी आकडेवारी
अमेरिकेत कोविड १९ मुळे नक्की किती मृत्यू झाले याचा अधिकृत आकडा ५ लाख ९६ हजार असा जाहीर केला गेला असला तर युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन ने कोविड संक्रमणात ९ लाखापेक्षा जास्त मृत्यू झाले असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे स्वास्थ्य सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी एका टीव्ही कार्यक्रमात या दाव्याला समर्थन दिल्याने त्याला अधिक पुष्टी मिळाली आहे.
५. कोरोना बळींची संख्या अडीच लाखांवर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुले देशात हाहाकार मजला आहे ....या पार्श्वभूमीवर प्रचंड वेगानं होत असलेला प्रसार रोखण्यासाठी देशातील बहुतांश राज्यांनी लॉकडाउन आणि कडक निर्बंधांची पावलं उचलली. त्यामुळे काही प्रमाणात करोना रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र, दररोज होत असलेल्या मृत्यूंची संख्या कायम आहे.
देशातील एकूण करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.
६. महाराष्ट्रात लॉकडाउन वाढणार का?- राजेश टोपे
करोनाचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठू लागल्याने राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलाय . परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ठाकरे सरकारने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला लॉकडाउन नंतर १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लसींचा तसेच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे.
७. कोव्हॅक्सिनच्या लाभार्थ्यांना फटका
केंद्राच्या लस वितरणाच्या नियोजनातील गोंधळाचा फटका आता कोव्हॅक्सिनच्या लाभार्थ्यांना बसत आहे. लशीचा साठा शून्य झाल्याशिवाय दुसरा साठा मिळणार नाही या केंद्राच्या धोरणामुळे मार्चमध्ये सरसकट सर्वानाच कोव्हॅक्सिन लस टोचणे बंधनकारक केले. परंतु आता केंद्राकडून या लशीचा साठाच उपलब्ध होत नसल्याने कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेसाठी ४५ वर्षांवरील सुमारे साडेपाच लाख नागरिकांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
८.फ्रान्सकडून ४० मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा
समुद्रसेतू २ मोहिमेंर्तगत नौदलाच्या ‘आयएनएस त्रिकंड’ या जहाजावरून ४० मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू सोमवारी मुंबईच्या बंदरात दाखल झाला. कतारच्या हमाद बंदरावरून भारतीय नौदलाच्या त्रिकंड जहाजाने द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर्स वाहून आणले.
९. ‘रेमडेसिविर’चा काळा बाजार पुन्हा उघड
पिंपरी-चिंचवड शहरातील ‘रेमडेसिविर’चा काळा बाजार पुन्हा एकदा उघड झाला आहे. बेकायदेशीरपणे २१ रेमडेसिविर इंजेक्शन बाळगणाऱ्या तीन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. काळ्या बाजारात एका रेमडेसिविरसाठी ४० हजार रुपयांपर्यंत भाव असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. कृष्णा रामराव पाटील, निखिल केशव नेहरकर , शशिकांत रघुनाथ पांचाळ अशी आरोपींची नावे आहेत.
१०. जपानच्या विरोधी पक्षनेत्यांची ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी
करोनाचा कहर वाढत चालला असून तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याबाबत जपानमध्ये विरोध वाढू लागला आहे. भारत, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून मोठय़ा प्रमाणावर खेळाडू येणार असून त्यांच्याकडून जपानमधील जनतेला करोनाचा सर्वाधिक धोका आहे.
No comments
Post a Comment