Special report - हॉस्पिटलचे अग्नितांडव थांबणार कधी
News24सह्याद्री - हॉस्पिटलचे अग्नितांडव थांबणार कधी.......पहा सह्याद्री special रिपोर्ट
आजचा हा विषय आपल्या प्रत्येकालाच विचार करायला लावणारा आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात आता आपल्याला दवाखान्यात जाणं देखील असुरक्षित वाटायला लागलं का ? असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर बरीच उत्तरे हो या शब्दामध्ये येतील.कारण सध्या दवाखान्यांनी कोरोनाचे भांडवल केलय.याच भांडवलशाही वैद्यकीय व्यवसायाने इतकं उग्र रूप धारण केलंय कि सुविधा मिळत नाहीत म्हणून रस्त्यातच अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. २०२० च्या मार्च महिन्यात जगातील इतर देशांसारखी भारतामध्ये सुद्धा कोरोना नावाची महामारी आली आणि सगळ काही होत्याच नव्हत झाल. आज याच कोरोनाने खूप रौद्र रूप धारण केल आहे. ठिकठिकाणी लोकांना रेमिडीसिवीर भेटत नाहीत, पुरेसे बेड्स उपलब्ध नाहीत, लस भेटत नाहीये, मात्र आपला माणूस जगावा यासाठी जीवाच्या आकांताने पेशंटचे नातेवाईक टाहो फोडत आहेत. मात्र हे सगळ संकट असताना कोविड हॉस्पिटलमध्ये आगी लागण्याच्या घटना घडत आहेत, आता या घटना घडण्यामागे नेमका प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे कि याच हि राजकारण होतय. हा प्रश्न हि आपसूकच उभा राहतोय
नविन वर्षाच्या म्हणजेच २०२१ च्या सुरवातीपासूनचा आलेख जर आपण पाहिलात तर सर्रासपणे कोविड रुग्णालयांना आगी लागण्याच्या किंवा तिथे काहीतरी दुर्घटना होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. एप्रिलमध्ये तर आज पर्यंत अनेक ठिकाणी या घटना घडल्या आहेत. तर गेल्या ४ महिन्यात ५ मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत.बारकाईने निरीक्षण केल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अश्या दुर्घटना घडल्या नाहीत मग आताच या कोविड रुग्णालयांनाच का आगी लागत आहेत, कि या आग लागण्याच्या घटना म्हणजे निव्वळ योगायोग आहे, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात घर करून गेल्याशिवाय राहत नाही.
1. आता यातल्या काही दुर्घटना कोणत्या आहेत यावर एक नजर या टाकूयात...
भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेली आग
9. जानेवारी ला भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता.
२. सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग:
पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला २१ जानेवारीला भीषण आग लागली, त्यात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. सिरमच्या इतिहासात एवढी भयानक आग कधीच लागली नव्हती. आता हि आग लागली होती कि कुणीतरी लावली होती हा देखील मोठा प्रश्न उभा राहिला होता.
३. ड्रीम मॉल सनराईज हॉस्पीटलला आग
मुंबईत २४ मार्चला ड्रीम मॉल सनराईज हॉस्पीटलला आग लागली आणि त्यात ९ जणांचा मृत्यू झालाय.
४. 10 एप्रिल ला नागपुरच्या वाडी परिसरातील कोव्हिड रुग्णालयात आग लागली. 4 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला. ICU च्या एसी युनिटमध्ये हि आग लागली होती.
५. डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात झालेली ऑक्सिजन गळती
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात २१ एप्रिलला ला ऑक्सिजनची गळती झाली, यावेळी ऑक्सिजनअभावी तब्बल 22 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश आपण पाहिलात. अगदी मन सुन्न करणार हे चित्र होत.
६. मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेली आग
मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाला २३ एप्रिल ला हि भीषण आग लागली. या आगीत होरपळून 13 जणांना प्राण गमवावे लागले, तर काही जणांची प्रकृती गंभीर होती. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आलीय.
आता नेमके रुग्णालयात आग लागण्याची कारणं काय? हे पाहूयात
रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, रुग्णालयातील अग्निसुरक्षा तपासण्यात सरकारी यंत्रणांकडून होणारी दिरंगाई ही या अग्नितांडवाची प्रमुख कारणं आहेत.
१. अनेकदा कोव्हिड सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात अग्नीरोधक मटेरिअल वापरण्यात येत नाही त्यामुळे सुद्धा आग लागते.
२.• एसी रूममधील हवा दर तासाला कमीतकमी 20 वेळा पूर्ण बदलली गेली पाहिजे. रुममध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त असल तर आग भडकण्याची शक्यता असते.
तसेच कोव्हिड रुग्णालयात हात धुण्यासाठी सॅनिटायझर वापरतात. यातील ज्वालाग्रही गॅस हवेत रहातो. त्यामुळे देखील आग भडकू शकते.
• एसी सतत सुरू राहिला तर त्या पार्ट गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता असते.
• रुग्णालयात वायरिंग करतांना दोष राहिला तरीदेखील आग लागण्याची शक्यता असते.
मात्र आपल्या लोकशाही प्रधान देशात या आपत्कालीन व्यवस्थेच्या नावावर या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. देखभाल आणि दुरुस्ती याकडे दुर्लक्ष केलं जात आणि आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांच्या निष्काळजी पणामुळे हकनाक निरपराध लोकांना प्राणांना मुकावे लागत.
या दुर्घटना घडण्यामागे काही महत्वाचे धागेदोरे देखील आहेत, गेली जवळपास तीन दशके खासगीकरणाचा अनिर्बंध उदोउदो सुरू झाल्यानंतर सरकारी वैद्यकीय सेवेला घरघर लागली. सध्या सगळीकडे वैद्यकीय सेवेतून अधिकाधिक पैसे ओरबाडणे किंवा ते सहज ओरबाडता यावेत यासाठी वैद्यकीय यंत्रणा नेहमीच तत्पर असल्याचे आपल्याला दिसून आल आहे. सरकारी उदासीनता आणि सरकारी वेतन यांत अडकून बसलेली सरकारी वैद्यकीय व्यवस्था आणि केवळ काहीही मार्गाने चार पैसे हाती यावेत म्हणून खासगी डॉक्टरांनी तयार केलेली हि कामचलाऊ व्यवस्था अगदी स्वतच्या बेढब कारभारामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अनेकवेळा सरकार बदललं मात्र या गोंधळ आहे असाच राहिला. मात्र सरकारच्या या दिरंगाई कारभाराचा,तसेच आरोग्य व्यवस्थेत असणार्या त्रुटींचा सामना जनता कुठपर्यंत सोसत राहणार ,यावर तोडगा नेमका निघणार कधी आणि निघालाच तर आतापर्यत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांच्या वेदनेचा अंत होईल का हे फक्त पाहत राहण इतकच आपल्या हातात असेल.
No comments
Post a Comment