सारिपाट / शिवाजी शिर्के…. एसपी साहेब, कायद्याचा धाक संपलाय का?
News24सह्याद्री -
आरोपीला घेऊन जिल्हाधिकार्यांच्या कशा होतात बैठका?
कलेक्टर, आयुक्तांच्या बदलीची ऑक्सीजन पुरवठादाराकडून धमकी! कमीशनर शंकरराव, खुषमस्कर्यांतून बाहेर या आणि जरा नगरचा कानोसा घ्या!
सारिपाट / शिवाजी शिर्के -
कोरोनाची दुसरी लाट जोरात असताना तिसर्या लाटेची चर्चा सुरू झालीय! सारेच धास्तावले आहेत. दिलासादायक बातमी आली की दुसर्या क्षणाला धडकी भरवणारी बातमी येते. आज आपण घरात आहोत आणि उद्या कदाचित हॉस्पिटलमध्ये असू अशी भितीची भावना सर्वांच्याच मनात निर्माण झाली आहे. याही परिस्थितीत ज्यांच्यावर आपली सार्यांचीच भिस्त आहे ते जिल्हाधिकारी एका आरोपीला सोबत घेत आढावा बैठका आणि जिल्हाभरात प्रवास करताना दिसत आहेत! दुसरीकडे ऑक्सीजन पुरवठादार अनेकांची अडवणूक करतोय आणि नगरमधील एक गॅस कंपनीचा हाच मालक जिल्हाधिकार्यांसह औषध प्रशासनाच्या उपायुक्तांच्या बदलीची धमकी देत आहे. अशी धमकी देण्यापर्यंत जर ऑक्सीजन सप्लायरची हिंम्मत होत असेल तर नगरमध्ये गुंडाराज आले आहे काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय! आजच नगरमधील एका हॉस्पिटलमधील सात रुग्ण वेळेवर ऑक्सीजन न मिळाल्याने दगावले! प्रशासनाने लगेच हात वर केले! हे मृत्यू ऑक्सीजन अभावी गेले नसल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी केला आहे. शंकरराव, शहरात जे काही चालू आहे ते अत्यंत भयानक आहे आणि त्यास सर्वस्वी आपण आणि आपली यंत्रणा जबाबदार आहे हे का विसरता? कोरोनाचा कहर ओसरायला तयार नाही. अत्यंत भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याच्या मोडवर आता सारेच आले असताना प्रशासन निर्णय घेण्यास कमी पडताना दिसत आहे.
सारे काही राज्यकर्ते आणि प्रशासन करू शकणार नसल्याची भावना गावागावात पोहोचली असताना प्रशासनाने खमकेपणाने निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. जिल्ह्याचा गाडा ज्यांच्या नेतृत्वाखाली हाकला जातोय ते जिल्हाधिकारी बैठकांचा सपाटा लावून बसलेले असले तरी त्या बैठकांचे आऊटपूट काय? ऑक्सीजन आणि रेमडीसीव्हरचा प्रश्न कायम आहे. साधे इंजेक्शन भेटण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दूरदूर भटकंती करूनही हाती काहीच लागायला तयार नाही. याबाबत थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घातले आणि प्रशासन सतर्क केले असले तरी त्यातून दिलासादायक असे काहीच समोर आलेले नाही. महसूलमंत्री दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये आले होते. आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद त्यांनी घेतली. ही बैठक संपवून ते पाथर्डीकडे रवाना झाले. त्यांच्या ताफ्यासोबत अर्थातच जिल्हाधिकारी हे देखील सहभागी झाले होते. जिल्हाधिकार्यांच्या पिवळ्या दिव्याच्या गाडीत पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील अर्थातच ३०६ नुसार गुन्हा दाखल असणारा आरोपी बसलेला अनेकांनी पाहिला. हाच आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकार्यांच्या सरकारी गाडीत जिल्हाधिकार्यांच्या मांडीला मांडी लावून प्रवास करताना अनेकांनी पाहिला. आरोपी असणारा हा गृहस्थ जिल्हाधिकार्यांच्या गाडीत कसा असा प्रश्न अनेकांना पडलाय आणि त्याबाबतचे अनेक किस्से सध्या जिल्हा प्रशासनासह जिल्ह्याच्या सोशल मिडियात उपस्थित होत आहेत. इथे जीवन मरणाची लढाई चालू आहे, हॉस्पिटलमध्ये बेड मिळायला तयार नाही आणि रेमडीसीवरसह ऑक्सीजनची मोठी समस्य निर्माण झाली असताना जिल्हाधिकारी आरोपीला सोबत घेऊन बैठका घेत आहेत याचे आश्चर्य अनेकांना वाटत आहे. जिल्हाधिकारी साहेब, तुमच्या गाडीत तुम्ही कोणाला घेऊन फिरायचं हा तुमचा व्यक्तीगत अधिकार नक्कीच आहे. मात्र, हे तुम्ही तुमच्या स्वत:च्या निवासी वास्तव्य असणार्या जिल्ह्यात करू शकता! तुम्ही जिल्ह्याचे कारभारी आहात. कारभारीच जर आरोपी घेऊन फिरु लागले आणि बैठका घेऊन घेऊ लागले तर बाकीच्यांनी काय आदर्श घ्यायचा! कोेरोना महामारीने सारेच हैरान झाले आहेत.
तुम्ही तुमचे काम चोखपणे करत आहात. मात्र, त्याचे परिणाम दिसायला तयार नाही. नगर शहरातील औद्योगिक वसाहमतीमध्ये श्रीरामपूरच्या लोढांचा ऑक्सीजन निर्मितीचा प्लँट आहे. अन्य काही प्लँट आहेत. लोढांच्या मालकीचा अहमदनगर इंडस्ट्रीअल गॅस कंपनी नावाचा प्लँट आहे. या प्लँटची पाहणी करण्यासाठी आम्ही स्वत: तेथे गेलो होतो. त्यावेळी बोलताना या कंपनीचे संचालक असणारे रमेश लोढा यांनी धक्कादायक अशी माहिती दिली. नगरच्या औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त मी ठरवतो. याआधी यातील तीघांच्या बदल्या मी मुंबईत जाऊन केल्या! जिल्ह्याचा जिल्हाधिकारी देखील मी बदलू शकतो आणि याआधी मी स्वत: जिल्हाधिकारी बदलून दाखवला आहे, अशी धक्कादायक माहितीच त्यांनी दिली. जिल्हाधिकार्यांच्या बदल्यांचे अधिकारी या गॅस कंपनीच्या लोढाला कोणी दिले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. औषध प्रशासनाचा उपायुक्त हा लोढा बदलून आणतोय! नगरमध्ये ऑक्सीजन भेटायला तयार नाही आणि हाच लोढा त्याच्या गुंडांना सोबत घेऊन ऑक्सीजन सिलिंडर मिळविण्यासाठी त्याच्या फॅक्टरीवर आलेल्या डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचार्यांना झोडपून काढतोच कसा या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला द्यावे लागणार आहे. मारहाण करण्याचे अधिकार या लोढाला दिले कोणी? याच रमेश लोढा यांना लिक्वीड ऑक्सीजन मिळत नव्हता, त्यावेळी आम्हीच सारीपाट मांडला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर त्याला ऑक्सीजन मिळू लागला.
मात्र, त्यानंतर याच लोढाने डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचार्यांना गुंडांमार्फत झोडण्याचे काम केले. याशिवाय ऑक्सीजनचे सिलींडर चढ्या भावाने विकण्यास प्रारंभ केला. औषध प्रशासनाचा आयुक्त, उपायुक्त खिशात असल्याची भाषा वापरणार्या लोढावर नक्की मेहेरनजर कोणाची? आज नगरमध्ये ऑक्सीजन मिळायला तयार नाही. स्टेशन रस्त्यावरील एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन मिळाले नाही म्हणून सात जण दगावलेत! ज्यांच्या कुटुंबातील हे सदस्य गेले त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल याचा विचार न केेलेला बरा! त्याहीपेक्षा ज्या हॉस्पीटलमध्ये हा प्रकार घडला त्या डॉक्टरांना काय वाटत असेल? उपचार देता येणे शक्य असताना केवळ ऑक्सीजन मिळाला नाही म्हणून रुग्ण तडफडून गेल्याची वेदना जेव्हढी नातेवाईकांना तेवढीच त्या डॉक्टरांना झाली असणार! रुग्णांना जीव गमवावा लागला असताना महापालिकेच्या आयुक्तांनी हॉस्पिटलचा दावा लागलीच खोडला! त्यांना हा दावा खोडावाच लागणार आहे. कारण तसे त्यांनी केले नाही तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. नगरचे आयुक्त शंकरराव गोरे हे नव्यानेच नगरमध्ये बदलून आलेत! शंकरराव, तुम्हाला जरा खुषमस्कर्यांच्या फौजेतून बाहेर यावे लागणार आहे. तुमच्या आधीच्या आयुक्तांनी सुवर्णमप्राईड हॉटेलमध्ये बसून केलेले उद्योग अद्यापही चर्चेत आहेत. तुमच्याबाबत वेगळ्या चर्चा सुरू होण्याआधी आयुक्त म्हणून आपल्या कामाची छाप तयार करावी लागणार आहे.
नगरमध्ये डॉक्टर जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करता काम करत असताना एमआयडीसीतील ऑक्सीजन सप्लायर हॉस्पिटलच्या स्टाफला गुंडांकरवी ठोकून काढत असेल तर त्याचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ बाहेरचा नक्कीच नाही! याच जिल्ह्यातील आहे. शेवटी याच गावच्या बोरी आहेत आणि याच गावच्या बाभळी आहेत हे लक्षात ठेवा! लोढा साहेब, कोरोना महामारीत दुकानदारी नक्की होईल तुमची! पण, याचा तळतळाट तुम्हाला नक्कीच लागणार आहे. या महामारीत ज्यांनी-ज्यांनी दुकानदारी केली त्यांना सार्या रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा तळतळाट लागणार हे नक्की! या महामारीचा गैरफायदा घेत किती पैसे कमवले याहीपेक्षा किती माणसे वाचवली ही भावना आता सार्यांच्या मनात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यातच सार्यांचे भले आहे!
No comments
Post a Comment