21 एप्रिल सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - ऑक्सिजन मॅन लोकांना देत आहे मोफत ऑक्सिजन सिलेंडर...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. २४ तासांत दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू
देशात करोनाचा कहर वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गेल्या २४ तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ इतकी झाली आहे.
2. नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाविरोधातील पोलीस कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
3. शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली.
4. झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा: चंद्रकांत पाटील
अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. कोरोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
5. महाराष्ट्र आता कोरोना लसी परदेशातून आयात करणार
राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
6. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार?
दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांचं मुल्यांकन कोणत्या आधारावर केलं जाणार, याबाबतीत विद्यार्थी आणि पालक यांच्यात कमालीची उत्सुकता आणि तेवढाच संभ्रमही पाहायला मिळत आहे. परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश कोणत्या आधारावर देण्यात येणार? याबाबतीतही अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असल्याचं पाहायला मिळत आहे.
7. लोकांना देतो मोफत ऑक्सिजन सिलिंडर
राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोज हजारो लोक रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शहानवाज शेख यांची विशेष चर्च होत आहे.
8. कोरोनाने निधनापूर्वी मुंबईतील महिला डॉक्टरची फेसबुक पोस्ट
शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले. डॉ. जाधव यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी, कारण अखेरचा श्वास घेण्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित तसे संकेत दिले होते.
9. डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर
राज्यभरात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून पुरवठा होणार असला तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली आहे. ऑक्सिजनअभावी डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर उतरल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं.
10. मराठवाडय़ात प्राणवायूसाठी कसरत सुरूच
दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना लागणारा प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी गळती रोखण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यत प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. ३० खाटांच्यावर क्षमता असणाऱ्या सर्व रुग्णालयांनी प्राणवायू केंद्र सुरू करावीत असे प्रयत्न विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पुढाकाराने हाती घेतले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे प्रस्तावही मागविण्यात आले आहेत.
No comments
Post a Comment