औरंगाबादेत अत्यावश्यक सेवेची दुकानंही दुपारी 1 पर्यंतच खुले राहणार, मोठा निर्णय
मुंबई -
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे औरंगाबादमध्ये गर्दी कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवांसंदर्भातही आणखी कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आता अत्यावश्यक सेवाही केवळ दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. केवळ मेडिकलला यातून सूट असेल पण त्यासाठीही नियम ठरवले आहेत. सर्व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत यावर एकमत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लावलेली संचारबंदी आणि तर कठोर निर्बंधांनंतरही औरंगाबादेत नागरिक बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तसंच रस्त्यांवर फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळं आता अत्यावश्यक सेवांवरही आणखी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थित झालेल्या या ऑनलाईन बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे. त्यात सर्वांनी एकमुखानं निर्णय घेतला. या निर्णयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. आमदार अंबादास दानवे हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहेत.
या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक सेवांमधील दुकानेदेखिल आता केवळ दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. एक वाजेनंतर सर्व दुकाने बंद राहतील असा निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. किराणा आणि इतर दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मेडिकलसाठीही काय नियम असणार यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार दवाखान्यासोबत असलेले मेडिकल 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. मात्र दवाखान्याशिवाय असलेले स्वतंत्र मेडिकल दुपारी एकनंतर संध्याकाळी 3 तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. अनेकदा नागरिक काहीतरी कारणानं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळाले आहे. दुकानात खरेदीच्या बहाण्याने सर्रास बाहेर फिरत असून दुकानांतही गर्दी होत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असल्यानं अखेर आता यावरही निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी यावर निर्णय घेऊन आता आदेश काढण्याची शक्यता आहे.
No comments
Post a Comment