नगरच्या राजकारणातील हा एक अनोखा ‘सहमती पॅटर्न’
अहमदनगर -
अहमदनगर जिल्ह्यामधील राजकारणातील एक अनोखा सहमती पॅटर्न माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव काळे यांचा राजकारणातील विरोध असूनही सहमती व मैत्रीचे पर्व हे राज्यातील राजकारणी व राजकीय अभ्यासकांचा कुतूहलाचा विषय राहिला आहे. आता त्यांची तिसरी पिढी राजकारणात आहे. पण त्यांच्यातही सहमतीच्या राजकारणाचे पर्व सुरू झाले आहे. नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे व विवेक कोल्हे हे बिनविरोध निवडून आले. त्यानिमित्ताने काळे व कोल्हे यांच्या तिसऱ्या पिढीचा जिल्ह््याच्या राजकारणात प्रवेश झाला. सहमतीच्या राजकारणामुळे हे घडले. माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे दोघेही राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक, कधी दोघे एकाच पक्षात तर कधी वेगवेगळ्या पक्षात राहिले. एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्या. त्यांचे कार्यकर्तेही स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात होते. व आजही आहेत.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत आदी संस्थांमध्ये ते एकमेकांच्या विरोधात असत. पण दोघांच्या संजीवनी व कोळपेवाडी या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध करत. रयत शिक्षण संस्था व अन्य सामाजिक क्षेत्रांत ते एकत्र येत. दोघे एकमेकांवर स्थानिक प्रश्नांवर टीका करत, पण ती व्यक्तिगत नसे. उलट त्यांचे कौटुंबिक संबंध हे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जाहीर सभांमध्ये त्याचा उल्लेख केला. माजी खासदार यशवंतराव गडाख व माजी मंत्री कोल्हे यांनी त्यावर लिहिलेही. राज्याच्या राजकारणातील हा एक अनोखा पॅटर्न आहे. नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत काळे व कोल्हे हे नेहमी एकत्र असत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, शिवाजीराव नागवडे, माजी खासदार यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे, मधुकर पिचड, आप्पासाहेब राजळे आदी बँकेत राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येत. प्रस्थापित नेत्यांना विखे यांनी नेहमी विरोध केला. त्यामुळे या नेत्यांशी त्यांचे कधी जमले नाही. मध्यंतरी बँकेवरील प्रस्थापित कुटूंबाची पकड गेली होती. पण आता आता सारे पुन्हा एकत्र आले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले. त्यांनी बहुतांश जागा बिनविरोध निवडून आल्या. बँकेवर पुन्हा प्रस्थापित नेत्यांचे वर्चस्व आले आहे. यापूर्वी माजी आमदार अशोक काळे यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बिपिन कोल्हे, त्याच्या पत्नी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एकमेकांविरुद्ध विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. पण दुसऱ्या पिढीतही सहमती कायम होती. आता आशुतोष काळे हे आमदार आहेत. तर विवेक कोल्हे नव्याने राजकारणात सक्रिय झाले आहेत. काळे हे राष्ट्रवादीत तर कोल्हे हे भाजपात आहे. बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले व भानुदास मुरकुटे यांना विखे यांना शह देण्यासाठी बरोबर घेतले. पण त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली नाही. कर्डिले बँकेत येऊ नये म्हणून काही नेत्यांनी प्रयत्न केले. बँकेवर मंत्री थोरात यांचा प्रभाव आहे. राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे भाचे जावई हे बँकेचे अध्यक्ष झाले. त्याविरुद्ध मुरकुटे यांनी मोहीम उघडली आहे. नगर जिल्ह््यात सोधा (सोयरे- धायरे) पक्ष असून त्यांनी शेळके यांना अध्यक्ष केले. त्यामुळे आता पवार यांच्याकडे मुरकुटे तक्रार करणार आहे.
No comments
Post a Comment