पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर
मुंबई -
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार नाव निश्चित करण्यात आले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची आज दुपारी घोषणा केली आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून समाधान महादेव आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात आता १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चितबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सगळ्याचं लक्ष लागले होते.
जयंत पाटील यांनी ट्वीट करून भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांच्या मान्यतेनं पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहे. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा! असे पाटील यांनी म्हटले आहे. भारत भालके यांचे अकाली निधन झाल्यानं मतदासंघात त्यांच्या कुटुंबीबद्दल सहानुभूतीचा लाट आहे. त्यामुळे भालके यांच्या मुलांऐवजी म्हणजे भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी दिल्यास विजयी होण्याची जास्त शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्याही उमेदवारीबद्दल चर्चा सुरू होती. मात्र, अखेर भगीरथ भालके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
No comments
Post a Comment