Breaking News

1/breakingnews/recent

कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ; पिंपरी चिंचवडमध्ये कडक निर्बंध लागू

No comments


पिंपरी चिंचवड -

पिंपरी चिंचवडमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहरात दरदिवशी 1400 हून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. वारंवार निर्देश देऊन शहरातील नागरिक व दुकानदारांकडून नियमाचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार आता रुग्णसंख्येनुसार रेड, ऑरेज झोनमध्ये शहराची विभागणी करण्यात येणार आहे. नियम मोडणारी दुकाने, आस्थापने सील करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात भरारी पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आज आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहे. शहरामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. सद्यस्थितीत तब्बल 10 हजाराहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाकडून वारंवार नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

मात्र नागरिकांकडून त्याची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सॅनिटायजरचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न ठेवणे आदी बाबी नागरिकांकडून घडत आहे. परिणामी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हाताबाहेर चालली आहे. यावर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार आजपासून शहरातील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहे. शहरातील सोसायटी, वस्ती व कॉलनी यामध्ये रुग्णांच्या संख्येनुसार तीन विभागात वर्गीकरण केले जाणार आहे. संबंधित भागातील एकूण लोकसंख्येच्या 5 टक्‍क्‍यांपेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या भागास पिवळा भाग घोषित करणे. एकूण लोकसंख्येच्या 5 ते 20 टक्के रुग्णसंख्या असेल तर त्या भागास नारंगी भाग घोषित करणे. तर एकूण लोकसंख्येच्या 20 टक्केपेक्षा अधिक रुग्ण असतील तर त्या भागास लाल  झोन घोषित केले जाणार आहे. रेड झोन असलेला भाग त्वरित सील करण्यात येणार आहे. तसेच त्या संबंधित भागात याबाबत चिन्हांकित फलक लावले जाणार आहे. 

शहरातील भाजी मंडई, विविध मार्केट, मजूर अड्डे, रहदारीचे रस्ते, गर्दी होणारे चौक याठिकाणी नियमित तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व दुकानदारांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. काटेकोरपणे नियम पाळले नाही तर शहरात करोना आणखी रौद्र रुप धारण करू शकतो. त्यामुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शहरातील बाजारपेठा, दुकानांमध्ये गर्दी करू नका, सॅनिटायजर, मास्कचा नियमित वापर करा. तसेच सामाजिक अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा. या त्रिसूत्रीतून आपण करोनाला हरवू शकतो.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *