टीम इंडियाचं ननवीन अस्त्र, वन डे मालिकेसाठी दोन नावं निश्चित
मुंबई -
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या टी 20 मालिका सुरु आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये वन डे मालिका रंगणार आहे. पुण्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा केली जाणार आहे. यामध्ये टी 20 प्रमाणे वन डे मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची चिन्हं आहे. कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि बडोद्याचा अष्टपैलू कृणाल पंड्या यांना वन डे संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज आणि नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकलेला जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा हे मात्र संघाबाहेरच असतील. क्रिकबज या वेबसाईटच्या माहितीनुसार, गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कृष्णाने 14 विकेट्स घेतल्या होत्या. कृष्णा हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो.
कृष्णाशिवाय मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांची निवड निश्चित मानली जात आहे. जसप्रीत बुमराहचे 15 मार्चला लग्न झाले. त्यामुळे तो शेवटचा कसोटी सामना आणि पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत खेळू शकला नाही. आता तो वन डे मालिकेतूनही सुट्टी घेणार आहे. तीन वन डे सामन्यांसाठी 18 जणांचा संघ निवडण्यात येणार आहे. यामध्ये कृणाल पंड्याचा समावेश झाला तर ही त्याची कारकिर्दीतील पहिलीच वन डे मालिका ठरेल. कृणाल पंड्याने यापूर्वी टी 20 मालिकेतून भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. कृणाल पंड्यानेही विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याने दोन नाबाद शतके आणि दोन अर्धशतके झळकावली होती. दुसरीकडे पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांनीही विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक धावा करुन, निवड समितीचे लक्ष पुन्हा वेधून घेतले आहे. या मालिकेत रवींद्र जाडेजाचे पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे. सध्या जे टी 20 संघात आहेत, त्यातील बरीच नावं वन डे मालिकेतही असतील. त्यामुळे जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाडेजाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. जाडेजाने सरावाला सुरुवात केली आहे. मात्र टीम मॅनेजमेंट कोणतीही घाईगडबड करण्याची शक्यता नाही.
No comments
Post a Comment