'या' कारणामुळे कोहलीने आपले स्थान इशान किशनला दिले, फलंदाजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण
मुंबई -
सध्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाने आठ गडी राखून पराभूत केले आहे. या सामन्यात भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. तसेच या सामन्यात विराट कोहलीने आपले स्थान इशान किशनला दिले होते आणि तो स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. आता भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी यामागचे कारण सांगितले आहे. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. फलंदाजीला आलेल्या भारतीय संघातील मुख्य फलंदाज केएल राहुल लवकर माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली ऐवजी इशान किशन मैदानावर आला होता. याबाबत अनेकांना विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी साठी का आला, हा प्रश्न पडला होता.
या प्रश्नाचे उत्तर देत विक्रम राठोड म्हणाले कुठलाही निर्णय दीर्घ काळासाठी घेतला जात नाहीये. आम्ही फक्त प्रयोग करून पाहत आहोत. मला वाटते की ही मालिका विश्वचषक स्पर्धेपूर्वीची शेवटची मालिका असेल किंवा शेवटचे काही टी२० सामने असतील. यामुळे आम्ही काही प्रयोग करत आहोत. तसेच काही पर्याय अंमलात आणत आहोत. तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही पाहतोय की विराट कोहलीला कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. तो असा खेळाडू जो आपल्या अनुभवाने कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. विश्वचषक स्पर्धेदरम्यान आम्ही हे देखील पाहणार आहोत की ज्या वेळेस संघाला त्याची गरज असेल त्याने त्यावेळेस फलंदाजीला जावे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी नियमितपणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर १४ वेळेस फलंदाजी केली आहे. यात त्याने ४२.२० च्या सरासरीने ४२२ धावा केल्या आहेत. या धावा त्याने १४४.५२ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात तो पुन्हा या क्रमांकावर फलंदाजी करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
No comments
Post a Comment