देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता भारतातील 8 राज्यांनी चिंता वाढवली
मुंबई -
महाराष्ट्र आणि दिल्लीसह 8 राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा चिंताजनक बनली आहे. 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रोज समोर येणारी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या 8 राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणाचा समावेश आहे. तर केरळमध्ये मात्र कोरोना रुग्णांच्या संख्या काहीशी कमी होताना पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाच्या एकूण ऍक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल 76.22 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत. यात महाराष्ट्रात तब्बल 62 टक्के, केरळमध्ये 8.83 टक्के तर पंबाजमध्ये 5.36 टक्के रुग्ण आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 81.38 टक्के मृत्यू हे 5 राज्यांमध्ये आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी 70 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पंजाबमध्ये 38, केरळमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशावेळी नागरिकांनी सरकारने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे. भाजी मंडई किंवा अन्य ठिकाणी होणारी गर्दी टाळली पाहिजे. रुग्णसंख्या वाढतच गेली तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल, असे स्पष्ट संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल 25 हजार 681 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21 लाख 89 हजार 965 इतकी झाली आहे. तर काल राज्यात कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण 53 हजार 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात एकूण 14 हजार 400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे
No comments
Post a Comment