16 जानेवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - सोने व्यापाऱ्याला तब्बल सव्वा दोन कोटींना लुटले....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
१. 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.
२. कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात
कोरोना रोखण्यासाठी देशात एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे. जगाताली सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमास आजपासून देशात सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधून या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ही लस करोना महामारीच्या विरोधात संजवीनी सारखं काम करेल आणि आता आपण या लढाईच्या अंतिम टप्प्यात आलोय, असे ते म्हणाले आहेत.
३. सोने व्यापाऱ्याला तब्बल सव्वा दोन कोटींना लुटले
जत शहराजवळील शेगाव रोडवर असलेल्या मानेवस्तीजवळ आटपाडीच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्यात आला. सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून व बेदम मारहाण करीत सुमारे 2 कोटी 26 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
४. दबंग अधिकारी सुनील केंद्रकर यांचा साधेपणा पत्नीसह बाजार करतानाचे फोटो व्हायरल
दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर पुन्हा एकदा त्यांच्या साधेपणामुळे चर्चेत आले आहेत. जिल्ह्यातील खुलताबाद येथील आठवडी बाजारात केंद्रेकर हे पत्नीसह जाऊन स्वतः बाजार करत असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मराठवाडा विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रकर यांचा प्रशासनात दरारा आहे. कडक शिस्त आणि सर्वसामान्यांसाठी बेधडक निर्णय घेत असल्याने त्यांची दबंग अधिकारी म्हणून ओळख आहे. मात्र, या सर्वात त्यांचा साधेपणाही अनेक वेळा दिसून आला आहे. शेतकरी कुटुंबातील केंद्रकर यांच्या याच स्वभावाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. अधिकारी असतानाही कसलाही बडेजाव न करता सर्वसामान्यांसारखे बाजार करताना ते दिसून आले आहेत.
५. खासगी आयटीआयना हवीय प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
मुंबई आणि उपनगरातील खासगी आयटीआय संस्थांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबई विभागातील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना कॉलेजशी संपर्क साधणे शक्य नाही. तसेच शहरात राहणारे बरेच विद्यार्थी कोरोनामुळे कुटुंबासह मूळ गावी परतल्याने ते पुढील शिक्षण घेऊ शकत नसल्यामुळे खासगी आयटीआयमधील 60 ते 70 टक्के जागा प्रवेश प्रक्रिया संपली तरी रिक्त आहेत.
६. परभणीत श्रींची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा संपन्न
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली इथे श्री सिध्दीविनायक गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि कलश रोहन कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झालाय. सकाळी गावातून श्रींची मिरवणूक काढण्यात आलीय, या शोभायात्रेमध्ये बालकापासून वयोवृध्दांनी श्रींचा जय घोष करुन फुगडीचा आनंद घेतला. प्राणप्रतिष्ठा आणि कलश रोहन झाले तर दुसऱ्या दिवशी महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
७.अकोला ते पातूर रोडवर भीषण अपघात
अकोला ते पातूर मार्गावर कापशी ते चिखलगांवदरम्यान प्रवासी वाहन आणि मालवाहू वाहनाला आज सकाळी11 च्या दरम्यान भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन्ही वाहनांची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात घडलाय. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अकोल्यात पाठविण्यात आले असून मृत व्यक्ती आणि जखमींची नावे कळू शकली नाहीत.
८. अपहरण झालेल्या तरुणाची सुखरुप सुटका,
फिल्मीस्टाईलने बस स्थानक जालना परीसरातुन युवकाचे अपहरण करणारे ०९ आरोपीच्या अवघ्या १६ तासात आवळल्या मुसक्या . अपहरण झालेल्या तरुणाची सुखरुप सुटका,पोलीस ठाणे सदर बाजार जालना ची विशेष कामगीरी जालना बसस्थानकात एका पांढऱ्या रंगाचे टाटासुमो कार मध्ये आलेल्या आठ ते नऊ ईसमानी फिल्मीस्टाईल एका युवकाचे अपहरण केल्याची माहीती स्थानिक प्रवाशी व प्रत्यक्ष हजर असलेले लोकानी पोलीस निरीक्षक, संजय देशमुख, पोलीस ठाणे सदर बाजार जालना यांना दिली होती. त्या नुसार पोलीस निरीक्षक, .संजय देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी बस स्थानक जालना येथे स्टॉफसह धाव घेऊन घटनेची खात्री करुन घेऊन जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे, व सर्व बंदोबस्तावरील पेट्रोलींगचे वाहनातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना नियत्रण कक्षा मार्फत सदर घटणे बाबत बिनतारी संदेशा द्वारे कळवुन नाकाबंदी करुन अपहरण झालेल्या युवकाचा व अपहरण करणारे आरोपीचा शोध घेण्यास कळवीले होते.
९. जिल्ह्याच्या इतिहासात कोव्हिड-19 लसीकरणाची सुवर्ण अक्षरांनी नोंद*
जिल्ह्यात आजपासून सुरु होत असलेल्या कोव्हीड-19 लसीकरणाची जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय परिचारिका महाविद्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते कोव्हिड-19 लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.
१०. पेट्रोल आणि डिजेलचे वाढते दर
राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या चाललेले आंदोलन यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. नागपूर येथे पेट्रोल आणि डिजेल दरवाढीविरोधात मोदी सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात येत होते. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोऱात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.
No comments
Post a Comment