जगात अशाप्रकारचे हल्ले होणं निंदनीय बाब आहे - अजित पवार
मुंबई -
अमेरिके मध्ये 2020 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेत अजूनही राजकीय तणाव व वादविवाद सुरु आहे. काल(दि.7-१-२०२१) अमेरिकेत अनपेक्षित असा अभुतपूर्व सत्तासंघर्ष पहायला मिळाला. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात चार आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
अमेरिकेतील घटना निंदनीय अनपेक्षित आहे असे अजित पवार म्हणाले. जगात अशाप्रकारचे हल्ले होणे निंदनीय बाब आहे. या घटनेचा धिक्कार केला पाहिजे. वेगवेगळी मते विचार असू शकतात, सगळ्यांना एकाचेच विचार पटतील असे नाही. त्यालाच आपण लोकशाही म्हणतो. परंतु तिथे निवडणूक सुरू होती आणि निकाल लागला तेव्हापासूनच ऐकायला मिळत होते की ट्रम्प यांना निकालच मान्य नाही. मतमोजणीला मानत नाही असे ते म्हणाले होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण आपण त्याबाबत फार चर्चा करण्यापेक्षा आपल्या समस्यांना आणि प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे असे अजित पवार म्हणाले
निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची काल बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसले आणि गोंधळ घालायला सुरूवात केली. परिणामी संसदेचे कामकाज थांबवावे लागले. ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या हिंसाचारात चार आंदोलनकर्त्याचा गोळी लागून मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. पण त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment