भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत दिली जाणार
दिल्ली -
भंडारा दुर्घटना मृत्यूमुखी पडलेले १० बालके जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याने दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. तेथील १७ नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुलगे असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या माता टाहो फोडत होत्या. त्यांच्या आक्रोशाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात ‘आऊटबॉर्न’ आणि ‘इनबॉर्न’ असे दोन कक्ष आहेत. सर्व मृत बालके ‘आऊटबॉर्न’मधील आहेत. त्यातील दोघांचा होरपळून, तर आठ बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
भंडाराची दुर्घटना समोर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा तातडीचा आढावा घेतला आणि मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी प्रत्यक्ष दुर्घटना घडलेल्या रुग्णालयाला आणि पीडित कुटुंबांना भेट दिली. यावेळी आपल्याकडे सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून त्यांचे सांत्वन केले असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
No comments
Post a Comment