नगरमध्ये प्रबळ नेत्यांचेच वर्चस्व; राम शिंदे याना मोठा फटका
मुंबई
अहमदनगर जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित नेत्यांनी आपले वर्चस्व कायम राखले याचा फटका काही नेत्यांना बसला आहे. बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, शंकरराव गडाख, रोहित पवार, तनपुर आदीे प्रस्थापित नेत्यांनी आपापले वर्चस्व कायम राखले. त्याच वेळी भाजपचे नेते व माजी मंत्री राम शिंदे यांना या निवडणुकीत मोठा फटका बसला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे बरेच प्रयत्न झाले. वित्त आयोगाचा मोठा निधी थेट ग्रामपंचायतींना उपलब्ध होऊ लागला. आमदार, खासदारांनाही विकासकामांसाठी ग्रामपंचायतीची सत्ता हवी असते. सरपंचपदाचे आरक्षण आणि निवडही बाकी आहे. यापूर्वीचा सरपंच जनतेतून निवडून आला होता. आता तो सदस्यातून निवडला जाणार आहे.
निवडणूक गाव कारभाऱ्यांची असली तरी मंत्री, खासदार, आमदार गावात ठाण मांडून बसले होते. अनेक ठिकाणी याच नेत्यांच्या समर्थकांमध्ये निवडणुकीत झुंजी रंगल्या आहे. जिल्ह्य़ात ७६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील ५२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ७०५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. निकालानंतर केवळ राष्ट्रवादीकडून ३२५ ग्रामपंचायतीत सत्ता आल्याचा दावा झाला. भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस यापैकी कोणीही आकडेवारीचा दावा करण्यासाठी पुढे आले नाही. महाविकास आघाडी अपवादात्मक ठिकाणी, केवळ श्रीगोंदे, पारनेर, अकोले या ठिकाणच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊनच झाली आहे. पक्षीय नेते आणि पदाधिकारी यांचे पॅनल व त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या आघाडय़ा यांचीच चलती अधिक होती.
निवडणुका स्थानिक पातळीवरील आहेत म्हणून मातबर नेत्यांनी त्याकडे अजिबात दुर्लक्ष केले नव्हते. आपल्याच निवडणुकीची उजळणी त्यामाध्यमातून पुन्हा एकदा करून घेतली. परस्परांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती हिसकावून घेण्यासाठी जोरदार लढाई करण्यात आली. लढाई ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थेट नेत्यांमध्ये न रंगता त्यांनी त्या आपापल्या समर्थकांमार्फत खेळल्या. पद्मश्री पोपटराव पवार यांनी देशाला दिशा देणारे काम आदर्शगाव हिवरेबाजारच्या माध्यमातून केले. गेली ३५ वर्षे या गावातील निवडणूक बिनविरोध होत होती. यंदा पवार यांना गावातून आव्हान दिले गेले. ते त्यांनी लीलया पेलले हा भाग वेगळा. त्याच वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र प्रतिसाद न देणाऱ्यांना गावकऱ्यांनी थारा दिला नाही. आदर्शगावातील व्यवस्थेबद्दलही तरुण अस्वस्थ आहेतच हे त्यातून समोर आले.
No comments
Post a Comment