विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती : आशिष शेलार
News24सह्याद्री -
मुंबई -
आरे येथील मेट्रो कारशेड कंजूरमार्गला हलवल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद निर्माण झाला असून, मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. याचा पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा तिघाडीच्या ठाकरे सरकारचा कारभार असल्याचा आरोप शेलारांनी केला आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी आरेच्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय केला होता. त्याच वेळेला आम्ही म्हटले होते की, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होत आहे. मीठागर आयुक्त सॉल्ट कमिश्नरची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का?, असा सवालही आम्ही उपस्थित केला आहे.
ठाकरे सरकारच्या अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. मेट्रोच्या विकासामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. जागा ट्रान्सफर करताना ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होती, ती केलेली दिसत नाही. मीठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही. अडकवणे, जनतेला भटकवणे आणि चुकीची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे, असा यांनी निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीचा त्यांचा कारभार आहे. तसेच मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपवली आहे. यामध्ये राज्य सरकार सर्वस्वी दोषी असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.
No comments
Post a Comment