राज्यात 1 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार : मुख्यमंत्री ठाकरे
News24सह्याद्री -
मुंबई -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 1 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सोमवारी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. 15 कंपन्यांमार्फत राज्यात जवळपास 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणूकीमुळे राज्यातील 23,182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे. कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी भविष्यात 1 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की, आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरच 1 लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वासदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
No comments
Post a Comment