पवार कुटुंबीयांचा निर्णय बारामतीत यंदा एकत्रित दिवाळी साजरी होणार नाही...
News24सह्याद्री -
नागरिकांमध्ये करोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दरवर्षी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन बारामतीत परंपरेनुसार दिवाळीचा सण साजरा करतात. दिवाळी पाडव्याला हितचिंतकांच्या स्नेहभेटी होतात. पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनीं यंदा बारामतीला न येता आपल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी.
करोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुयात, असे विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबियांच्या वतीने राज्यातील जनतेला व हितचिंतक बंधु-भगिनींना करण्यात आले आहे.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबियांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असून बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामुहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
No comments
Post a Comment