शेतकर्यांना तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस
News24सह्याद्री -
मुंबई -
अतिवृष्टी-बोंडअळीच्या रोगामुळे कापूस-सोयाबीनचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत, शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला विलंब यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. आताच्या अनुमानानुसार ५० टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते आणखी वाढत जाणार आहे. साधारणत: एकरी ६ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी १ क्विंटल आणि फार कमी ठिकाणी २ क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे. अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे जवळजवळ ८० टक्क्यांच्या आसपास नुकसान झालेले आहे आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.”
अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने विदर्भातील प्रशासनाला निर्देश देऊन, दिवाळी ७ दिवसांवर आली असताना तातडीने मदत वितरित करावी. ही कारवाई त्वरेने पूर्ण न केल्यास विदर्भातील शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाईल. अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्यांना तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
No comments
Post a Comment