उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेंचा - बुऱ्हानगरच्या जगदंबा मातेचा महिमा
News24सह्याद्री -
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे बुऱ्हानगर (अहमदनगर) हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते. यामागचे मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते. तब्बल पाचशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर-माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे विषेश!
पैठणच्या शालिवाहन राजघराण्याला उतरती कळा लागल्यानंतर राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बुऱ्हानगरला आणून ठेवले. त्यावेळी या ठिकाणचे नाव अंधेरी नगरी होते. याठिकाणी तेलंगा नावाचा राजा होता. देवीची मूर्ती तब्बल ३०० ते ४०० वर्षे याठिकाणी होती. हे राजघराणे प्रथम देवकर व नंतर भगत आडनावाने ओळखले जाऊ लागले. आज या घराण्याचे वंशज अर्जुन किसन भगत हे आहेत. तेलंगा राजा कर्नाटकवर स्वारी करण्यास गेल्यानंतर मूर्ती बरोबर घेऊन गेले. डोंगराळ परिसर असलेल्या चिंचपूर(तुळजापुर) मध्ये मूर्ती सुरक्षेसाठी ठेवली. लढाई चालू असताना तेलंगा राजाचा अंत झाला. आज श्री तुळजा भवानी मातेच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर तेलंगा राजाची समाधी आहे.
त्यानंतर बहामनी राजवट सुरु झाल्यावर मूर्ती पुन्हा बुऱ्हानगरला आणली.अहमदनगरला निजामाचा त्रास होऊ लागल्यावर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. निजामच्या नजरेपासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी जानकोजी देवकर भगत यांनी अपार कष्ट घेतले. निजामाची करडी नजर चुकवत मूर्ती परत नगरला नेली आणि निजाम राजवट संपुष्टात येताच तुळजापुरला आणली गेली. जानकोजी हे देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांना एकदा मुलीच्या रुपात दर्शन दिले. त्यांनी तिचे नाव कौतुकाने अंबिका ठेवले.मी जशी तुझी सेवा केली तशी माझ्या पिढ्यानपिढ्यांना ही सेवा लाभावी. त्यावर देवी म्हणाली, तू पाठविलेल्या पालखीतून मी सीमोल्लंघन करीन व पलंगावर पाच दिवस निद्रा करीन. दरवर्षी नवीन पालखी नगरजवळील हिंगणगावात केली जात होती. ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुका फिरुन घटस्थापनेला हिंगणगावात येते. नंतर दुसऱ्या दिवशी नगर, भिंगार कँप तिसऱ्या माळेला बुऱ्हानगरच्या यात्रेदिवशी दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ पर्यंत पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात.
No comments
Post a Comment