Breaking News

1/breakingnews/recent

सारिपाट सह्याद्रीचा - खाकीवर्दीतील बदमाशांमध्ये मनोज पाटील यांची दहशत;दत्ता राठोड व गर्जेची नार्को टेस्ट होणार का?

No comments

  News24सह्याद्री - 

                                      


नगरच्या पोलिस दलाला किती किड लागली आहे आणि प्रत्येक पोलिस ठाण्यात किती ‘गर्जे’ आहेत हे आता लपून राहिलेले नाही. नेवासा पोलिसा ठाण्यातील ‘गर्जे’ने निरीक्षकाचा बळी घेतलाच परंतू त्याहीपेक्षा त्याने थेट विकेट घेतली ती अप्पर पोलिस अधीक्षकांचीच! या संपूर्ण प्रकरणाची आता वरिष्ठ चौकशी करतीलच! मात्र, त्याहीपेक्षा चौकशी होण्याची आवश्यकता आहे ती खाकी वर्दीला बदनाम करणार्‍या चौकडीची! प्रत्येक पोलिस ठाण्यात अशा चौकडी आहेत आणि त्यांचे उपदव्याप खाकीला बदनाम करणारे आहेत! पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हातात दंडुका घेण्याआधी खराटा घेतल्याचे दिसते. खराट्याचे फटकारे नेमकेपणाने पडत असल्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम होणार हे नक्की! पथकाच्या नावाखाली वसुली होत असल्याचे स्पष्ट होताच उपनिरीक्षकासह सात कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई झाली. स्वागतार्ह अशीच ही कारवाई! गर्जे आणि अप्पर अधीक्षक यांच्या ऑडीओ क्लीपचा विचार करता या प्रकरणात ज्यांची नावे आलीत त्या सर्वांचीच चौकशी होण्याची गरज आहे.पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगरची सुत्रे हाती घेतली त्याचवेळी त्यांना त्यांचा इरादा जाहीर केला होता. 

पोलिस दलाची प्रतिमा उंचावेल असे काम करतानाच वर्दीला बदनाम करणार्‍यांची गय होणार नाही असे स्पष्ट केलेेल्या मनोज पाटील यांनी अवघ्या महिनाभरात आपली झलक दाखवून दिली. चोरांचा बंदोबस्त होण्याआधी मोरांचा बंदोबस्त होत असल्याचे आता गंमतीने म्हटले जात आहे. पोलिस दलातील हे मोरच खाकीला बदनाम करतात हे चाणक्ष असणार्‍या मनोज पाटील यांनी हेरले आणि त्यांनी मुळावरच घाव घातला!दत्ता राठोड हे नगरला अप्पर अधीक्षक म्हणून आले आणि त्यांनी कारवाईचा धडाका लावला! खरे तर ही चांगलीच गोष्ट होती. मात्र, कालच्या ऑडीओ क्लीपमधील ‘सेटींग लाव नाही तर मग ‘रेड’ टाकतो’, हे वाक्य बरेच बोलके आहे. याआधी त्यांनी ज्या रेड केल्या त्याठिकाणी सेटींग झाली नाही असाच त्याचा दुसरा अर्थ निघतो! त्यामुळे त्यांच्या कारवाईने काहीजण दुखावले असं म्हणणंच चुकीचं! उलटपक्षी राठोड यांच्या पथकाने केलेल्या कारवाईला ‘सेटींग’चाच वास राहिला. बनावट डिझेल प्रकरणातील कारवाईने काहींनी राठोड यांची बदली केली अशी चर्चा झडत असली तरी त्या चर्चेत तथ्य वाटत नाही.

दत्ता राठोड यांचे आणि त्या गर्जे नामक कॉन्सटेबलचं बोलणं दि. १६ ऑक्टोबर रोजी झाले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी ही ऑडीओ क्लीप वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हातात पडली. ही ऑडीओ क्लीप हातात पडताच ती मुंबई- नाशिकच्या वरिष्ठांकडे रवाना झाली. त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी स्वत: पोलिस अधीक्षकांना करावी लागणार होती. याच कालावधीत मनोज पाटील हे आजारी रजेवर होते.हजर होताच त्यांनी याबाबत चौकशी केली आणि अहवाल सादर केला. डिझेलची रेड आता तीन दिवसांपूर्वी झाली. ज्यादिवशी राठोड यांच्या कथीत पथकाने रेड केली, त्याच्या आदल्या दिवशी राठोड यांच्या विरोधातील अहवाल वरिष्ठांकडे रवाना झाला होता. त्यामुळे डिझेलची कारवाई आणि त्याआडे कोणी मंत्री आणि आमदाराने हस्तक्षेप करीत राठोड यांची बदली केली असं म्हटलं जात असेल तर त्यात मुळीच तथ्य वाटत नाही.दत्ताराम राठोड हे ‘नगर सह्याद्री’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात आले होते आणि त्यांनी पत्रकारिता कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले होते. शुभेच्छा देताना ते बरेच काही बोलले! मात्र, त्यातील काही भाग आम्ही तुम्हाला दाखवत आहोत!चांगल्या दर्जेदार पत्रकारीतेची अपेक्षा ठेवणार्‍या राठोड यांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्याच व्यासपीठावर मार्गदर्शन केले. काय म्हणाले होते खा. डॉ. विखे पाटील.

तुम्हाला हा जिल्हा समजेल लवकरच! असं सुचक विधान सुजय विखे पाटील यांनी केले होते. अवघ्या आठ- दहा दिवसात राठोड यांना ते उमगले! ते स्वत: आणि गर्जे या दोघांमधील संभाषणाची ही वादग्रस्त ऑडीओ क्लीप बाहेर येतेच कशी या एकाच प्रश्‍नाने राठोड साहेब परेशान असतील. दोघांमधील हे बोलणे तिसर्‍याच्या हाती जातेच कसे? राठोड साहेब, हा नगर जिल्हा आहे! येथे काहीच लपून राहत नाही! तुम्ही दोघेच बोलले! दोघांच्याही मोबाईलमध्ये हे बोलणे रेकॉर्ड झाले! तुमच्या दोघांपैकी एकानेही ते व्हायरल केले नसणार! मग, तरीही ही क्लीप बाहेर आलीच! साहेब, नगरी माणसं आहेत येथे! आणि हो. राठोड साहेब, गर्जेसोबत बोलताना तुुम्हीच म्हणाला होतात की, ‘पाथर्डीकर दम काढत नाहीत’! खरं आहे साहेब, पाथर्डीकरांना दम निघत नसेल तर मग नगरकरांना कसा निघणार! म्हणूनच ही क्लीप थेट ‘न्यूज २४ सह्याद्री’च्या हाती आली.राठोड हे याच जिल्ह्यातील! पाथर्डी तालुक्यातील! जिल्हा परिषदेच्या शाळेत मास्तरकी करताना त्यांनी स्पर्धा परिक्षा दिल्या आणि ते पोलिस दलात दाखल झाले. मात्र, मास्तरकीचा पिंड त्यांचा अजिबात गेला नसल्याचे गर्जे याच्यासोबतच्या ऑडीओ क्लीपमधून समोर आले आहे.

एका कॉन्सटेबलसोबत कसे आणि किती बोलावे याचे धडे राठोड यांनाच देण्याची आवश्यकता आहे. आपल्या सहकारी अधिकार्‍यांबद्दल, पोलिस खात्यातील हप्तेखोरीबद्दल राठोड बोलले! त्यांचे हे बोलणे पोलिस खात्यातील हप्तेखोरीवर शिक्कामोर्तब करणारीच ठरली असल्याने गर्जे या पोलिस शिपायासह राठोड यांची नार्कोटेस्ट होण्याची गरज आहे. या दोघांच्याही नार्कोटेस्टमधून बरेच काही बाहेर येऊ शकते.प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान एक किंवा दोन कर्मचारी हे तेथील साहेबांच्या खास मर्जीतील! साहेबांचे ‘कलेक्शन’ या कर्मचार्‍यांकडे असते अशी चर्चा जाहीरपणे होतेय! साहेबांसाठी कलेक्शन करणारा हा कलेक्टर जिल्ह्याच्या कलेक्टरला भारी! त्याचा रुबाबही भारी असतो. प्रत्येक पोलिस ठाण्यात कार्यरत असणार्‍या अशा कलेक्टरची यादी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासण्याची गरज आहे. कालच्याला राठोड यांच्या कथीत पथकातील उपनिरीक्षकासह सारे कर्मचारी निलंबीत केले गेले. 

तोच न्याय प्रत्येक पोलिस ठाण्यातील ‘कलेक्टर’ला दिला जावा अशी मागणी पुढे आली तर नवल वाटू नये!बनावट डिझेलचं प्रकरण अत्यंत नाजूक आहे. या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे. गुटखा आणि बनावट डिझेल या दोन्ही विषयांनी मनोज पाटील यांना सलामी दिली आहेच! मनोज पाटील यांची काम करणार्‍याची पद्धत पाहता ते या दोन्ही विषयांच्या खोलात नक्की जातील अशी अपेक्षा ठेवू या! जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याआधी पोलिस दलातील बदमाश मंडळींमध्ये पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी वचक निर्माण केलाय! हा वचक शिपाई, उपनिरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि अप्पर अधीक्षक अशा सर्वांवर एका झटक्यात कारवाई करून मनोज पाटील यांनी कृतीने दाखवून दिलाय! बदमाश कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी यातून बोध घेतला नाही तर त्यांना घरचा रस्ता ठरलेला! पाटील साहेब, तुमच्या कृतीचे जिल्ह्यातील जनता स्वागत करत आहे इतकेच!  आता अन्य बदमाश अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी काय ते समजून घ्यावं आणि ‘सेटींग’ची सवय बदलावी! नसता... मनोज पाटील नामक खमका पोलिस अधीक्षक आहेच! अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यास!

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *