Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - जागतिक इंटरनेट दिन विशेष - इंटरनेटच्या जन्माचा इतिहास...

No comments

       News24सह्याद्री  - जागतिक इंटरनेट दिन विशेष - इंटरनेटच्या जन्माचा इतिहास......पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये

ऑक्टोबर महिन्यातील २९ तारीख ही ‘जागतिक इंटरनेट दिन’ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात १९९५च्या सुमारास इंटरनेट उपलब्ध झालं असलं, तरी त्यापूर्वी कित्येक दशके अमेरिकेत (आणि काही युरोपियन देशांमध्येही) त्यासंबंधीचं संशोधन जोमानं चाललेलं होतं. आज भारतासह संपूर्ण जग ज्या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन’ मानतं, तो दिवस आहे २९ ऑक्टोबर १९६९ हा.   १९६९ वर्ष विज्ञानाच्या दृष्टीनं तस पाहिलं तर एकूणच क्रांतिकारी होतं. २१ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग नं चंद्रावर पाऊल ठेवलं. त्याच वर्षी पुढे सुमारे ३ महिन्यांनी २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरचा जगातला पहिला संदेश ऑनलाईन पाठवला गेला. म्हणूनच या २९ ऑक्टोबर तारखेला ‘जागतिक इंटरनेट दिन’ मानलं गेलं आहे.

प्रत्यक्ष १९६९च्या २९ ऑक्टोबरला जो प्रसंग घडला, तो मोठा मनोरंजक आहे. १९६0च्या दशकात अमेरिकन सैन्याला इंटरनेटसारखी व्यवस्था गुप्त संदेशवहनासाठी हवी होती. त्यादृष्टीनं अमेरिकन संरक्षण खात्यानं अर्पानेट नावाच्या एका संशोधन प्रकल्पाला मोठं अर्थसाह्य देऊन अमेरिकेतील काही विद्यापीठांकडे त्या संशोधनाचे आव्हान सोपवलं होतं. या प्रकल्पांतर्गत एकूण चार संगणक अमेरिकेतील चार विद्यापीठांमध्ये जोडण्यात आलेले होते. खरं तर त्या चार संगणकांचं ते जगातलं पहिलं इंटरनेट होतं. या चार संगणकांपैकी एक होता कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठात, तर दुसरा होता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात. तिसरा आणि चौथा संगणक कॅलिफोर्निया सांता बार्बरा आणि उता विद्यापीठात बसविलेला होता. १९६९चे ते संगणक अर्थातच आजच्यासारखे प्रगत नव्हते. मॉनिटर्स तर हिरव्यार्जद अक्षरांनी चमकणारे असत.

त्या पार्श्वभूमीवर २९ ऑक्टोबरला कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या चार्ली क्लाईन अवघ्या २१ वर्षाच्या   तरुण पदवीधर विद्यार्थ्यानं स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागाला फोन लावला. पलीकडच्या लाईनवर स्टॅनफोर्डचा बिल डुवाल हा तरुण होता. चार्लीनं फोनवर सांगितलं, की ‘मी आता माझ्या इथल्या संगणकावर काही टाइप करणार आहे. तुझ्याकडे तो संदेश येतोय का पाहा?’ इकडे स्टॅनफोर्डचा बिल डुवाल तो संदेश प्राप्त करण्यास उत्सुक होता. दोघंही एकीकडे एकमेकांशी फोनवर बोलत होते, तर दुसरीकडे त्यांचे डोळे आपापल्या संगणकांच्या मॉनिटरवर एकाग्र झाले होते. इकडे चार्लीनं L अक्षर टाइप केलं. फोनवर तो बिलला म्हणाला, ‘अरे मी एल टाइप केला आहे. बघ तुझ्याकडे आला का ते?’ बिल फोनवर उत्तरला, की ‘हो, आला इकडे एल’. चार्लीनं नंतर O अक्षर टाइप केलं. ‘मी ओ टाईप केला आहे’ तो फोनवर बिलला म्हणाला. ‘हो, ओ अक्षरपण आलं आहे,’ बिलनं प्रतिसाद दिला. ‘बरं मी आता G आणि I टाइप करतोय.’ चार्ली एवढं म्हणतोय न म्हणतोय तोच बिल ओरडला ‘थांब थांब, माझा कॉम्प्युटर क्रॅश झाला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या चार्लीला लॉगिन (LOGIN) हा शब्द स्टॅनफोर्डच्या बिलला पाठवायचा होता. त्यासाठी ही सारी यातायात चालली होती. मात्र, इंटरनेटवर जगात जो पहिला संदेश पाठवला गेला, त्यात दोनच अक्षरं होती L आणि O. नंतर तासाभरानं तो क्रॅश संगणक ठीक झाल्यानंतर चार्ली आणि बिल डुवाल यांना  लॉगिन हा संपूर्ण शब्द आणि अन्य संदेश पाठवण्यात यश आले. असा तो २९ ऑक्टोबर १९६९चा प्रसंग. अमेरिकन विद्यापीठं, त्यातील तरुण विद्यार्थी आणि अमेरिकन सैन्य एकमेकांना कशी पूरक ठरत होती, हाही त्यातून आपल्यासाठी निघणारा एक बोध.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *