सारीपाट सह्याद्रीचा - ऑडीटर डॉक्टरला अन् डॉक्टर पेशंटला लुटू लागलेत!
News24सह्याद्री -
कोरोना महामारीत काहींनी दुकानदारी मांडली असल्याचे ‘रेमडीसीवर’ या इंजेक्शनच्या काळ्या बाजारातील विक्रीतून स्पष्ट झाले आहे. ऐकीकडे हे सारे चालू असताना दुसरीकडे पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना काही हॉस्पिटलमधून अव्वाच्या सव्वा बीलांची आकारणी करुन लुटले जात असल्याचे समोर आले. त्यातून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासनातील काही अधिकार्यांच्या ऑडीटर नामक टीमने आता थेट हॉस्पिटल चालकांची लूट चालविली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनाग्रस्तांचा आकडा काही केल्या कमी व्हायला तयार नाही. अशा परिस्थितीत आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असलीे तरी या संकटकाळात काही महाभाग रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णाला आवश्यक असणारे ‘रेमडीसीवर’ हे इंजेक्शन नगरमध्येच नव्हे तर राज्याच्या अनेक भागात उपलब्ध व्हायला तयार नाही. उत्पादक कंपन्यांनी त्यांचे हेल्पलाईन नंबर जाहीर केले असले आणि त्यावर संपर्क साधून इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात तसे नाही.
हॉस्पिटलमधून अव्वाच्या सव्वा बिले घेतली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सर्वच कोविड हॉस्पिटलचे ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्यांच्या टीमकडून हे ऑडीट सुरू झाले आणि याच ऑडीटच्या नावाखाली डॉक्टरांना लुटले जात असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. ऑडीटरच लुटू लागल्याने हे पैसे आपसूकपणे रुग्णाच्या खिशातून काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अत्यंत भयानक असा हा प्रकार असून यात कोणी लक्ष घालणार आहे की नाही असाच काहीसा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
No comments
Post a Comment