सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण करू नका : बाळासाहेब थोरात
अहमदनगर । News24सह्याद्री -
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर काँग्रेसने प्रथमच प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाचे राजकारण करू नका असा टोला विरोधकांना हाणला आहे. दरम्यान विरोधक सरकार पडण्याचे दिवा स्वप्न पाहत असल्याचे ते म्हणाले.
सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांनी अप्रत्यक्षपणे सरकारमधील शिवसेनेच्या एका मंत्र्याला लक्ष्य केल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेने हे आरोप फेटाळले आहेत. तर, गृहखातं हातात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर भाष्य केले आहे. काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्यानं आतापर्यंत यावर थेट भूमिका मांडली नव्हती. नगरमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज यावर भाष्य केले. सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत आहे का, असे थोरात यांना विचारण्यात आले. त्यावर, 'या गोष्टीचे कोणीही राजकारण करू नये,' एवढंच ते म्हणाले.
'राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका राज्यातील भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही लवकरच राज्यातील सरकारचे विसर्जन होईल, असे वक्तव्य केले आहे.
याबाबत आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. 'रामदास आठवले यांनी नेमके काय वक्तव्य केले आहे, ते मी ऐकले नाही. परंतु भाजपचे लोक दिवास्वप्न पाहत आहेत की राज्यातील हे सरकार जाईल, आपले सरकार येईल. पण त्यांची ही भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही. आम्ही पाच वर्षे चांगले काम करणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
No comments
Post a Comment