आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद
सामना संपादकीयमधून पार्थ पवारांना शिवसेनेचा सल्ला
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्राद्वारे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी "नातवाच्या मताला कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे" असे म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. विरोधी पक्षातील नेत्यांनी पार्थ पवार यांची पाठराखण करत शरद पवार यांच्यावर टीका केली. यावर "शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल" असा सल्ला शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून दिला आहे.
“सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना?,” अशी शंका देखील शिवसेनेने उपस्थित केली आहे.
“पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल. पक्षाची धुरा संभाळणाऱ्याना "कटू" बोलवेच लागते असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
No comments
Post a Comment