बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्ता कामात भ्रष्टाचार ठेकेदार-अधिकार्यांवर गुन्हा नोंदवा
पंधरा दिवसांत चौकशी करा अन्यथा तीव्र आंदोलन : उपनेते अनिल राठोड
अहमदनगर । नगर सह्याद्री -
उपनगरातील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ झाले असून कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. चार महिन्यांतच रस्ता उखडला आहे. या कामाची चौकशी करुन महापालिकेचे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. पंधरा दिवसांत चौकशी होवून गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
उपनेते राठोड म्हणाले, बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्त्याच्या कामात अत्यंत निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे हा रस्ता चार महिन्यांत खराब झाला आहे. रस्त्याला वापरलेले गज उघडले पडले आहे. दरम्यान रस्ता खराब झाल्यामुळे शिवसेनेने मोठे आंदोलन केले होते. व त्या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
आंदोलनानंतर संबंधित ठेकेदाराने जुजबी दुरुस्ती करुन काम पूर्ण केले. परंतु, अवघ्या चार महिन्यांतच रस्ता उखडला आहे. रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून जनतेची फसवणूक झाली आहे. आंदोलनावेळी संबंधितांवर कारवाई न करता दडपशाही पद्धतीने ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना पाठीशी घालून शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
भ्रष्ट्राचार उघडकीस येवू नये म्हणून संबंधित ठेकेदाराने पुन्हा रस्त्याची डागडुजी सुरु केली आहे. या कामाची निष्पक्षपणे चौकशी करुन महापालिकेचे संबंधित अधिकारी, ठेकेदार व त्यांना साथ देणार्यांची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पंधरा दिवसांत रस्ता कामाची चौकशी करुन संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, मदन आढाव, अशोक बडे यांनी दिला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अशोक बडे, मदन आढाव, निलेश भाकरे, आकाश कातोरे आदी उपस्थित होते.
आता युनियन गप्प का? : मदन आढाव
बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या रस्त्याचे काम चांगले व्हावे यासाठी शिवसेनेने आयुक्तांच्या दालनात आंदोलन केले. चांगल्या कामासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु, त्या वेळी मनपा कामगार युनियनने तीन दिवस आंदोलन केले. रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. काम निष्कृष्ट आहे. तरी आता मनपा कामगार युनियन गप्प का? असा सवाल शिवसेनेचे मदन आढाव यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. निकृष्ट काम करण्यास जबाबदार असणार्यांवर गुन्हे नोंदवा अशी आढाव, भाकरे, बडे यांनी मागणी केली.
No comments
Post a Comment