शिवभोजन थाळीवर बड्यांचाच डल्ला!
गरजू लाभार्थ्यांना मिळेना लाभ । वेळेआधीच संपतात थाळ्या
चाँद शेख । नगर सह्याद्री -
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाविकास आघाडीच्या शिवभोजन थाळी योजनेचा लाभ गरजु लाभार्थ्यांना मिळण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या धनदांडग्यांकडून घेतला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे युती सरकारच्या काळात सुरु होऊन अल्पावधीत बंद पडलेल्या झुणका भाकर केंद्रांसारखी शिवभोजन थाळीची अवस्था होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
शिवभोजन योजनेअंतर्गत नगर शहरामध्ये पहिल्या टप्प्यात 26 जानेवारीला पाच व 1 मार्चपासून पुन्हा नवी पाच अशी एकूण दहा केंद्रे सुरु झाली असून या सर्व केंद्रांवर मिळून रोज नगरमध्ये चौदाशे थाळ्या या योजनेअंतर्गत देण्यात येत आहेत. मात्र यातील अनेक केंद्रावर वेळेआधीच थाळ्या संपत असल्याचे चित्र आहे. तसेच ज्यांना त्याचा लाभ मिळायला हवा त्यांना तो मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुपारी 12 ते 2 अशी दोन तासांची वेळ या भोजनासाठी आहे मात्र या वेळेआधीच अनेक केंद्रावर थाळ्या संपल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी होवू लागल्या आहेत.
दरम्यान, 26 जानेवारीला सुरू झालेल्या पाच केंद्रांपैकी कष्टाची भाकर केंद्र येथील थाळ्यांची संख्या शंभरने व कृष्णा भोजनालय व अन्नछत्र येथील थाळ्यांची संख्या प्रत्येकी पन्नासने वाढवण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून, या केंद्रावर वाढीव थाळ्या देण्यास सुरुवात झाली आहे.
नगर शहरासाठी सुरुवातीला दररोज सातशे थाळ्या शिवभोजन योजनेअंतर्गत देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी पाच केंद्रे सुरू करण्यात आली होती. आता ही थाळ्यांची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसेच नवीन पाच केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे नगरसाठी आता थाळ्यांची मर्यादा चौदाशे करण्यात आली आहे. असे असतानाही अनेक केंद्रावर थाळ्या वेळेआधीच संपत असल्याचे चित्र आहे.
नगर शहरातील दहा केंद्रेदहा रूपयांच्या थाळीसाठी दोनशे, पाचशेची मोड
कष्टाची भाकर केंद्र, माळीवाडा बसस्थानक
दत्त हॉटेल, रेल्वे स्टेशनसमोर
अन्नछत्र, तारकपूर बसस्थानकासमोर
कृष्णा भोजनालय, जिल्हा रूग्णालय परिसर
हॉटेल आवळा पॅलेस, मार्केटयार्ड
रेव्हेन्यू कॅन्टीन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ
तिवारी भोजनालय, टीव्ही सेंटर
स्वामी समर्थ स्नॅक बार स्वस्तिक बसस्थानक
बळीराजा भोजनालय, चौपाटी कारंजा
हॉटेल संस्कृती, मंगल गेट कोंडीमामा चौक
शिवभोजन थाळीची किंमत दहा रूपये आहे. मात्र, या केंद्रांवर जेवणासाठी आलेल्या अनेकांकडून पाचशे व दोनशे रूपयांची नोट दिली जाते. ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अशा गरजूंसाठी ही योजना असताना त्याठिकाणी पाचशे व दोनशे रूपयांची मोड करून घेणार्यांना लाभार्थी कसे म्हणायचे असा प्रश्न निर्माण होत आहे.
No comments
Post a Comment