करोना : ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद ; सर्व निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या
मुंबई / नगर सह्याद्री - करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक खबरदारी आणि पावलं उचलत आहे. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुंबईतील वर्षा निवासस्थानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून, रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
No comments
Post a Comment